गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामात आपली विजयी परंपरा कायम राखली आहे. अबु धाबीच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवर ५७ धावांनी मात केली आहे. मुंबईने विजयासाठी दिलेलं १९४ धावांचं आव्हान राजस्थानला पेलवलं नाही. ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि जेम्स पॅटिन्सन या त्रिकुटाच्या भेदक माऱ्यासमोर राजस्थानचा डाव कोलमडला.

मुंबईच्या गोलंदाजीचं ब्रम्हास्त्र म्हणून ओळख असलेल्या बुमराहने या सामन्यात चांगलीच कमाल दाखवली. ४ षटकांत २० धावा देत बुमराहने ४ फलंदाजांना माघारी धाडत आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली.

राजस्थान रॉयल्सकडून जोस बटलरने ७० धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली. परंतू त्याला दुसऱ्या बाजूने कोणत्याही फलंदाजाची साथ मिळाली नाही. दरम्यान त्याआधी, सूर्यकुमार यादवच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने १९३ धावांपर्यंत मजल मारली.