इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) मंगळवारी झालेल्या सामन्यामध्ये मुंबईच्या संघाने राजस्थानवर ५७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने ठोकलेल्या नाबाद ७९ धावांच्या बळावर मुंबईच्या संघाने राजस्थानला १९४ धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याच्या पाठलाग करताना जोस बटलर वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली खेळी करता आली नाही. बटलरने झुंजार ७० धावांची खेळी केली तर जसप्रीत बुमराहने २० धावांत ४ बळी टिपले. राजस्थानचा संघ १३६ धावांपर्यंतच मजल मारु शकला. या विजयामुळे मुंबई इंडियन्सने गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली आहे तर सलग पाच पैकी तीन सामन्यांमध्ये पराभव झालेला राजस्थानचा संघ सातव्या स्थानावर घसरला आहे.
सोमवारच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर मात करुन दिल्लीचा संघ गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानी पोहचला होता. मात्र मंगळवारी मुंबईने पुन्हा अव्वल स्थान पटकावले. मालिकेमध्ये आतापर्यंत सर्वाधिक म्हणजेच सहा सामने खेळणाऱ्या मुंबईच्या संघाने चार सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दिल्लीनेही आपल्या पाच पैकी चार सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दोन्ही संघाचे गुण समान असले तरी मुंबईची धावगती दिल्लीपेक्षा सरस असल्याने मुंबई पहिल्या तर दिल्ली दुसऱ्या स्थानी आहे. गुणतालिकेमध्ये तिसऱ्या स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आहे. चौथ्या स्थानावर कोलकाता आहे. तर मुंबईकडून पराभव होण्याआधी पाचव्या स्थानावर असणारा राजस्थानचा संघ दोन स्थांनांनी घसरून सातव्या स्थानी गेला आहे. धावगतीच्या जोरावर चेन्नईने पाचवे तर हैदराबादने सहावे स्थान मिळवले आहे. कोलकाता, चेन्नई, हैदराबाद आणि राजस्थान या चारही संघाचे गुण सारखे असले तरी सरासरी धावगतीच्या आधारे त्यांना गुणतालिकेमध्ये स्थान देण्यात आलं आहे. चेन्नईविरुद्धच्या पराभवामुळे पंजाबचा संघ पाच सामन्यांपैकी चार सामन्यांमध्ये पराभव झाल्याने तळाशी गेला आहे.
आयपीएलच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.