सलामीवीर मयांक अग्रवाल आणि कर्णधार लोकेश राहुलने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात २२३ धावांचा डोंगर उभा केला. नाणेफेक जिंकत राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतू लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल जोडीने शारजाच्या मैदानात फटकेबाजी करत राजस्थानच्या गोलंदाजांना अक्षरशः सळो की पळो करुन सोडलं.

पॉवरप्लेच्या षटकांमध्ये पंजाबच्या सलामीवीरांनी ६० धावा करत विक्रमाची नोंद केली. आयपीएलच्या तेराव्या हंगामात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पंजाबने आपल्या नावावर केला. २२४ धावांचं आव्हान घेऊन मैदानावर उतरलेल्या राजस्थाननेही धडाकेबाज सुरुवात केली. सलामीवीर जोस बटलर स्वस्तात माघारी परतल्यानंतर स्टिव्ह स्मिथ आणि संजू सॅमसन जोडीने फटकेबाजी करत संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी फटकेबाजी करत राजस्थानला पॉवरप्ले षटकांमध्ये ६९ धावा करत अवघ्या काही मिनीटांत पंजाबचा विक्रम मोडला.

दरम्यान, डेव्हिड मिलरला विश्रांती देऊन संघात स्थान दिलेला जोस बटलर आपल्या पहिल्या सामन्यात फारशी चमक दाखवू शकला नाही. अवघ्या ४ धावा काढत बटलर कोट्रेलच्या गोलंदाजीवर माघारी परतला.