आयपीएलमध्ये नेहमीच सर्व संघ आणि खेळाडूंवर कामगिरीचे मोठे दडपण असते. काही सामन्यांमध्ये अपयशी ठरल्याने तुम्हाला संघाबाहेर फेकले जाऊ शकते, तर काही सामन्यांमध्ये अप्रतिम कामगिरी करून तुम्ही हिरो बनू शकता. सोमवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करून प्लेऑफमध्ये जाण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. मात्र त्यानंतरही संघनिवडीवरुन कर्णधार श्रेयस अय्यरने भाष्य केले आहे ज्यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

मात्र विजयानंतर प्लेइंग-११ मधील बदलाबाबत श्रेयस अय्यरशी चर्चा केली असता, तो म्हणाला की, प्लेइंग-११ निवडण्यात प्रशिक्षकासोबतच सीईओचांही सहभाग असतो. या सामन्यादरम्यान, पॅट कमिन्सने जोरदार फटकेबाजी केली रवी शास्त्रींनी याबाबत टिप्पणी केली. “शुकर है पॅट कमिन्स को खिलाया है. पता नाही क्या कर रहा था बेंच गरम कर के. ऑस्ट्रेलियाका कॅप्टन है, वर्ल्ड क्लास बॉलर है और बिठाया गया उसे!” असे शास्त्री म्हणाले. १८ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध केकेआरच्या सामन्यानंतर कमिन्सला बसवण्यात आले होते.

त्यानंतर श्रेयस अय्यरला याबाबत विचारण्यात आले होते. “हे खरोखर कठीण आहे. जेव्हा मी आयपीएल खेळायला सुरुवात केली तेव्हा मी देखील त्या स्थितीत होतो. आम्ही प्रशिक्षकांशी चर्चा करतो, संघ निवडीत सीईओचाही सहभाग असतो. बाज (मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम) खेळाडूंकडे जातात आणि त्यांना सांगतात की ते खेळत नाहीत. या सर्वांचा निर्णय घेण्यास खूप पाठिंबा असतो. प्लेइंग इलेव्हनमधील प्रत्येक व्यक्ती ज्या प्रकारे मैदानावर उतरते, ती कर्णधार म्हणून अभिमानास्पद आहे,” असे अय्यर म्हणाला.

कोलकाता नाईट रायडर्सचे सीईओ वेंकी म्हैसूर आहेत, जे अनेकदा मैदानावर दिसतात. कोलकाता नाईट रायडर्स दोन वेळा आयपीएलची चॅम्पियन आहे, पण यावेळी त्यांची कामगिरी चांगली झाली नाही. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी कोलकाता इतर संघांवर अवलंबून आहे, तरीही पोहोचणे खूप कठीण दिसते.

कोलकात्यासाठी एकाच प्लेइंग – ११ सोबत खेळणे अवघड जात आहे. त्यामुळेच आतापर्यंत झालेल्या १२ सामन्यांमध्ये संघाने २० हून अधिक खेळाडू खेळवले आहेत. ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधार असलेल्या पॅट कमिन्सची गणना सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये केली जाते. मुंबईविरुद्धच्या दोन्ही सामन्यात तो विजयाचा हिरो असताना पाच सामन्यांत त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले होते.

पीटीआय या वृत्तसंस्थेने वेंकी म्हैसूर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ आला नाही. मात्र, श्रेयस अय्यरचे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने घेतला जात असल्याचे केकेआर व्यवस्थापनातील सूत्रांचे म्हणणे आहे. प्लेइंग-११ निवडण्यात सीईओंचा कोणत्याही प्रकारे सहभाग नसतो, जर कधी त्यांचे मत जाणून घेतले तर ते नक्कीच सल्ला देतात, असे त्यांनी म्हटले आहे.