आयपीएल २०२२ च्या ३८ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध, पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज ऋषी धवन सोमवारी हेड प्रोटेक्शन घालून गोलंदाजी करण्यासाठी आला होता. त्यानंतर धवनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. धवनला सहा वर्षांनंतर आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने चार षटकांत ३९ धावा देत दोन विकेट घेतल्या. चेन्नई सुपर किंग्जच्या अंबाती रायडूने धवनच्या चेंडूवर खूप धावा काढल्या. त्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने याबद्दल एक ट्विट केले आहे जे खूप व्हायरल होत आहे.

धवनचा फोटो शेअर करत जाफरने हे ट्विट केले आहे. “रायडू आज अधिक आक्रमक फलंदाजी करत आहे. ऋषी धवनच्या चष्म्याने त्याला आणखी काहीतरी आठवण करून दिली असेल,” असे वसीम जाफरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

भारताच्या २०१९ विश्वचषक संघात स्थान नाकारल्यानंतर रायुडूने केलेल्या ट्विटकडे जाफरने लक्ष वेधले आहे. २०१९च्या विश्वचषक संघ निवडीनंतर रायुडूचे थ्रीडी ट्विट व्हायरल झाले आहे. रायुडूची २०१९ विश्वचषकासाठी भारतीय संघामध्ये निवड जवळपास निश्चित मानली जात होती. परंतु त्याच्या जागी निवडकर्त्यांनी विजय शंकरला संधी दिली आणि सांगितले की तो क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगला खेळ करतो, त्यामुळे त्यांनी विजय शंकरला प्राधान्य दिले आहे. यानंतर रायडूने ट्विटरवर, विश्वचषक सामना पाहण्यासाठी त्याने थ्रीडी चष्मा मागवला आहे, असे म्हटले होते.

ऋषी धवनने त्याच्या पहिल्याच सामन्यात भेदर मारा करत गोलंदाजी केली. या संपूर्ण सामन्यात त्याने चेहऱ्यावर फेस शिल्ड लावली होती. आयपीएल सामने सुरु होण्यापूर्वी तो रणजी ट्रॉफीमध्ये खेळत होता. यावेळी सामन्यादरम्यान त्याच्या चेहऱ्याला लागले होते. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच कारणामुळे आयपीएलमध्ये सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये तो पंजाब किंग्जच्या संघामध्ये दिसला नाही. ऋषी धवनवर नाकाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे चेंडू लागू नये किंवा इतर कसलीही इजा होऊ नये म्हणून त्याने फेस शिल्ड लावली होती.

दरम्यान, सोमवारी चेन्नई सुपर किंग्जला आणखी एक पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नईचा ११ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना शिखर धवनच्या अर्धशतकाच्या जोरावर पंजाबने चेन्नईसमोर १८८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येसमोर जडेजाच्या संघाला २० षटकांत केवळ १७६ धावाच करता आल्या. रायुडूने चेन्नईकडून सर्वाधिक ७८ धावांची खेळी खेळली. पंजाब किंग्जचा या मोसमातील हा चौथा विजय असून ते आठ गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचले आहेत. चेन्नईचा या मोसमातील हा सहावा पराभव आहे.