IPL 2024, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders: कोलकाता नाईट रायडर्सचा पदार्पणवीर फलंदाज अंगक्रिश रघुवंशीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २७ चेंडूंत ५४ धावा केल्या. पहिल्याच सामन्यात त्याने शानदार अर्धशतक झळकावले. आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर या खेळाडूने त्याच्या डोक्याकडे बोट दाखवून आनंद साजरा केला. पण या अर्धशतकाचं खास सेलिब्रेशन त्याने एका खेळाडूसाठी केले आहे. सामन्यानंतरच्या व्हीडिओमध्ये त्याने याबद्दल सांगितले.
दिल्लीविरूद्धच्या केकेआरच्या ऐतिहासिक सामन्यानंतर त्याला त्याच्या सेलिब्रेशनबद्दल विचारण्यात आले. तेव्हा रघुवंशीने प्रसिद्ध मँचेस्टर युनायटेड क्लबचा फुटबॉलपटू मार्कस रॅशफोर्डसारखे सेलिब्रेशन केले. केकेआर संघातील माझा सहकारी नितीश राणा या खेळीमागचं प्रेरणास्थान आहे. पुढे सांगताना अंगक्रिश म्हणाला आम्ही दोघे मँचेस्टर युनायटेड या फुटबॉल क्लबचे चाहते आहोत. राणा सध्या दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे या खेळीमागे तोच प्रेरणास्थान आहे असं रघुवंशीने सांगितलं.
दिल्लीविरूद्धच्या सामन्यात कोलकाता संघाने विस्फोटक फलंदाजी करत २७२ धावा केल्या आणि यासह आयपीएलच्या इतिहासातील दुसरी मोठी धावसंख्या संघाने उभारली. सलामीवीर सुनील नरेनने ३९ चेंडूंत ८५ धावांची अप्रतिम खेळी केली तर आंद्रे रसेलने १९ चेंडूंत ४१ धावा केल्या. रिंकू सिंगनेही आपली तुफानी खेळी करत ८ चेंडूंत २६ धावा केल्या.