IPL 2024, Mumbai Indians vs Chennai Super Kings: ४२ वर्षीय धोनी अजूनही फिनिशरची भूमिका तितक्याच वादळी खेळीसह पार पाडतो. चेन्नईसाठी गेल्या काही सामन्यांमध्ये धोनीने फिनिशरच्या भूमिकेत निर्णायक खेळी केल्या. मुंबईविरूद्धच्या सामन्यात शेवटच्या षटकात फलंदाजीला येत धोनीने सलग तीन षटकार लगावत सामन्याचा रोख बदलला. गेल्या हंगामात धोनी गुडघ्याच्या त्रासाने त्रस्त असल्याचे दिसत होते, पण यंदा मात्र धोनी खेळताना सहज असल्याचे पाहायला मिळाले. पण गोलंदाजीचे सहयोगी प्रशिक्षक एरिक सिमन्स यांनी धोनीच्या दुखापतीबद्दल सांगितले आहे.
सिमन्स यांच्या मते माजी कर्णधार दुखापतीशी झुंजत आहे, परंतु तो त्याच्या वेदनांकडे दुर्लक्ष करत आहे आणि सीएसकेसाठी आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करत आहे. एरिक सिमन्सने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, “धोनीपेक्षा इतर सर्वांना त्याच्या दुखापतीची जास्त काळजी आहे. मी भेटलेल्या सर्वात कणखर व्यक्तिमत्त्वांपैकी तो एक आहे. मला वाटतं, त्याला (धोनीला) किती वेदना होत असतील याचा अंदाजही कोणाला नसेल. तो पुढे जात फक्त आपल्या कामगिरीवर लक्ष देत आहे.”
“मला खात्रीनिशी वाटतंय की त्याला किरकोळ दुखापत आहे. पण या दुखापतीकडे दुर्लक्ष करत संघासाठी जे आवश्यक आहे ते करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. आम्ही त्याच्या दुखापतींबद्दल अधिक चिंतित आहोत. आम्ही म्हणजे सारेच त्याचे चाहते, प्रेक्षकवर्ग यांना धोनीच्या दुखापतींबद्दल त्याच्यापेक्षाही अधिक काळजी आहे.”
धोनीची क्रिकेटप्रति असलेली निष्ठा आणि कामगिरीतील सातत्य हे फक्त सीएसकेसाठीच नाही तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी प्रेरणा देणारे आहे.