अहमदाबाद : ‘आयपीएल’च्या सलामीच्या लढतीत पराभूत होण्याची मुंबई इंडियन्सची मालिका सलग १२व्या वर्षी कायम राहिली. रविवारी झालेल्या या सामन्यात मुंबईला आपला नवा कर्णधार हार्दिक पंडयाचा माजी संघ गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात हार्दिकने सातव्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि त्याच्या या निर्णयाचे अनेकांना आश्चर्य वाटले. मात्र, हा निर्णय केवळ हार्दिकने नाही, तर पूर्ण संघ व्यवस्थापनाने मिळून घेतला होता, असे मुंबईचा फलंदाजी प्रशिक्षक किरॉन पोलार्डने स्पष्ट केले.

हेही वाचा >>> IPL 2024 : नवनेतृत्वाची कसोटी; चेन्नईसमोर आज गुजरातचे आव्हान

या सामन्यात गुजरातने दिलेल्या १६९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ सुस्थितीत होता. त्यांना ३० चेंडूंत ४३ धावांची आवश्यकता होती आणि त्यांचे सात फलंदाज शिल्लक होता. मात्र, यानंतरच्या दोन षटकांत मिळून मुंबईला केवळ सात धावा करता आल्या आणि त्यांनी खेळपट्टीवर स्थिरावलेल्या डेवाल्ड ब्रेव्हिसला (४६) गमावले. यानंतर हार्दिकने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याऐवजी टीम डेव्हिडला पाठवले. डेव्हिडला १० चेंडूंत ११ धावाच करता आल्या. मग सातव्या क्रमांकावर फलंदाजी आलेल्या हार्दिकने अखेरच्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर अनुक्रमे षटकार आणि चौकार मारला. मात्र, उमेश यादवने टाकलेल्या या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर तो बाद झाल्याने मुंबईच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. मुंबईला अखेर सहा धावांनी हार पत्करावी लागली.

हेही वाचा >>> IPL 2024 RCB vs PBKS: गुजरातला नकोसा ‘यश’, बंगळुरूसाठी मौल्यवान; कॉमेंट्रीदरम्यान कोणी केलं असं वक्तव्य?

‘‘सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा निर्णय हा केवळ हार्दिकचा होता असे म्हणणे चुकीचे ठरेल. संघ म्हणून आम्ही योजना आखतो. कोणता फलंदाज सामन्याच्या कोणत्या परिस्थितीत सर्वोत्तम कामगिरी करू शकेल याचा आम्ही विचार करतो. या सामन्यात आमच्या आघाडीच्या फळीने दीर्घ काळ फलंदाजी केली. तसेच अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्याची क्षमता असणारे दोन फलंदाज आमच्याकडे होते. डेव्हिडने यापूर्वीच्या हंगामांत आमच्यासाठी विजयवीराची भूमिका चोख बजावली आहे. हार्दिक वर्षांनुवर्षे आम्हाला सामने जिंकवून देत आहे. मात्र, कधी तरी त्यांनाही अपयश येऊच शकते,’’ असे पोलार्ड म्हणाला. ‘‘केवळ हार्दिकला दोष देणे थांबले पाहिजे. आम्ही चर्चा करून सर्वांच्या सहमतीनेच निर्णय घेतो. त्यामुळे कोणत्याही निर्णयासाठी एकटया हार्दिकला जबाबदार धरणे योग्य नाही,’’ असे म्हणत पोलार्डने आपल्या कर्णधाराला पाठिंबा दर्शवला.