IPL 2024, Gujarat Titans vs Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा नवनिर्वाचित कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली संघाने आयपीएल २०२४ मधील पहिला सामना गमावला. गुजरात टायटन्सच्या घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सचा आठ धावांनी पराभव झाला. मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद पंड्याला दिल्याने चाहते फ्रँचायझीवर प्रचंड नाराज होते आणि या सामन्यात ही नाराजी त्यांनी नारेबाजी, पोस्टरबाजी करत स्पष्टपणे व्यक्तही केली. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सामना पाहायला आलेल्या रोहित शर्माच्या आणि मुंबई इंडियन्सच्या अनेक चाहत्यांनी हार्दिक पंड्याला ट्रोल केले आणि त्याच्या विरुद्ध नारेबाजी ही केली.

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबई इंडियन्सकडे पाहिले जाते. संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली एम आयने आयपीएलची पाच जेतेपद पटकावली. मुंबई इंडियन्स संघाचे लाखो चाहते आहेत. पण यंदाच्या हंगामात मुंबई संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे नसून हार्दिक पंड्याला देण्यात आले आहे. मुंबई इंडियन्स फ्रॅचायझीचा हाच निर्णय चाहत्यांना पटलेला नाही.

Mumbai Indians captain Hardik Pandya arguing with umpire
DC vs MI : दिल्लीच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानंतर हार्दिक पंड्या अंपायरवर संतापला, काय होत कारण?
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: १२ वर्षांनी शतक तरीही सेलिब्रेशन नाही, रोहित शर्माचा सामन्यानंतरचा व्हीडिओ चाहत्यांना करतोय भावुक
Rohit sharma speech in Mumbai Indians Dressing Room Video MI vs DC
IPL 2024: ‘वैयक्तिक कामगिरी, विक्रम फारसे महत्त्वाचे नाहीत…’, रोहित शर्माने मुंबईच्या विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंशी साधला संवाद
Mumbai Indians Vs Delhi Capitals Delhi Capitals Match Updates in Marathi
MI vs DC : रोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रचला इतिहास, ‘हा’ विक्रम करणारा विराट कोहलीनंतर ठरला दुसराच खेळाडू

कर्णधार हार्दिक पंड्याने सामन्यादरम्यान घेतलेले अनेक निर्णयही चाहत्यांना पटले नाहीत. यावरून सोशल मीडियावरही अनेक मीन्स, पोस्ट, व्हिडिओ व्हायरल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. यासोबतच सामन्यादरम्यान समालोचकांनी सुद्धा हार्दिक पंड्याच्या अनेक निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले. एकंदरीतच पहिल्या आयपीएलच्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सला जोरदार ट्रोल केले जात आहे पण या ट्रोल करण्याची नेमकी ठोस कारणं काय आहेत यांचा आढावा घेऊया.

बुमराह असतानाही प्रथम गोलंदाजीला हार्दिकने सुरूवात केली

मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातविरुद्ध च्या सामन्याला सुरुवात होताच चाहत्यांसह सारे दिग्गज क्रिकेटपटू आणि समालोचकही चकित झाले. बुमराहसारखा उत्कृष्ट वेगवान गोलंदाज संघात असतानाही नवा चेंडू त्याच्याकडे न सोपवता हार्दिक पंड्याने स्वतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पांड्याचा हा निर्णय पुरता फसला आणि गुजरातने पहिल्याच षटकात त्याची धुलाई केली. जीटीचे सलामीवीर शुबमन गिल आणि वृद्धिमान साहा यांनी या पहिल्या षटकामध्ये ११ धावा केल्या.

जसप्रीत बुमराह संघात असतानाही हार्दिक ने स्वतः पहिले षटक का टाकले, असा प्रश्नही इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसनने उपस्थित केला. त्यानंतरही हार्दिकनेच तिसरे षटक टाकले आणि ९ धावा दिल्या. यानंतर बुमराहला सामन्यातील चौथे षटक देण्यात आले आणि पहिल्याच षटकात त्याने साहाचा त्रिफळा उडवत मुंबई संघाला पाहिली विकेट मिळवून दिली. सामन्यानंतर इरफान पठाणनेही हार्दिक पंड्याने पहिले षटक टाकून चूक केल्याचे स्पष्टपणे म्हटले.

रोहितला बाऊंड्रीवर फिल्डिंगला पाठवल्याने हार्दिक ट्रोलर्सच्या रडारवर

मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद हार्दिक पंड्याला दिल्याने चाहते संघ व्यवस्थापनावर आधीच नाराज होते. याशिवाय कर्णधार पद हार्दिक पंड्याला दिल्यापासूनच त्याला सोशल मीडियावर रोहितचे चाहते तुफान ट्रोल करताना पाहिले. हार्दिकने क्षेत्ररक्षण सजवताना रोहितला बाऊंड्रीवर पाठवलं. त्यानेही चाहते नाराज झाले आहेत.

रोहित शर्मा हा कायम ३० गज वर्तुळात क्षेत्ररक्षण करताना आपल्याला दिसतो.पण हार्दिक पंड्याने सामन्यातील अखेरचा विसाव्या षटकामध्ये रोहित शर्माला थेट सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करण्यासाठी पाठवले. हार्दिक पंड्या गोलंदाजासोबत उभा होता आणि तिथून त्याने हातवारे करून रोहित शर्माला लॉंग ऑन जवळ क्षेत्ररक्षण करण्यासाठी जाण्याचा इशारा केला. रोहित शर्माला ही आधी कळेना तो नक्की कोणाला सांगतोय. म्हणून रोहितने त्याला प्रश्न विचारला कोण मी आणि त्याच्याकडून उत्तर मिळताच रोहित शर्मा थेट सीमारेषेवर गेला. पण तिथे पोहोचल्यानंतरही हार्दिक पंड्याने त्याला दोन-तीन वेळा इथून तिथे तिथून इथे असं नाचवलं. हार्दिक पंड्याची हातवरे करून सांगण्याची पद्धतही चाहत्यांना चांगलीच खटकली. रोहित शर्माचा हा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून चाहते प्रचंड भडकले आहेत.

फक्त सीमारेषा जवळच नाही तर आयपीएलच्या या सामन्यात रोहित शर्मा मिडविकेट, स्लिप, लाँग ऑन, लेगसाईड या सगळ्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना तो दिसला. या मुद्द्यावरूनही सोशल मीडियावर मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पांड्या प्रचंड ट्रोल होत आहेत.

लक्ष्याचा पाठलाग करताना हार्दिकऐवजी टीम डेव्हिडला आधी पाठवलं

लक्ष्याचा पाठलाग करत असताना रोहित शर्मा ४३ धावांवर बाद झाला आणि त्यानंतर ब्रेविसही ४६ धावांवर बाद झाला. यानंतर मात्र मुंबईच्या धावांना चांगलाच ब्रेक लागलेला पाहायला मिळाला. डेवाल्ड ब्रेविस बाद झाल्यानंतर खरंतर हार्दिक पंड्याने मैदानावर फलंदाजी करण्यासाठी येणे गरजेचे होते. ब्रेविस हा मोहित शर्माच्या षटकात बाद झाला. त्यावेळेस सामन्याची अखेरची चार षटके बाकी होती. तर गुजरात टायटन्सचा उत्कृष्ट फिरकीपटू रशीद खानचे एक षटकही बाकी होते. इतर कोणत्याही फलंदाजापेक्षा भारतीय फलंदाज संघात फलंदाजीसाठी बाकी असतानाही डेव्हिडला पाठवणे चूक असल्याचे इरफान पठाणनेही म्हटले.

हार्दिक पंड्याने स्वतः फलंदाजीला यायचे सोडून टीम डेविडला फलंदाजीसाठी आधी पाठवले याबद्दल इरफान पठाण म्हणाला, “राशीद खानचे एक षटक बाकी असताना टीम डेविड हार्दिकच्या आधी फलंदाजीला का आला होता? फिरकीविरुद्ध मी कधीही इतर कोणापेक्षाही भारतीय फलंदाजाला प्रथम प्राधान्य देईन.”

इरफान पठाणचे म्हणणे अगदी योग्य असल्याचे सामन्यात आपल्याला पाहायला मिळाले. हार्दिक पंड्याच्या आधी टीम डेविड फलंदाजीला आला आणि मोहित शर्माच्या षटकानंतर १७वे शतक राशिद खानने टाकले. या षटकात टीम डेविड फिरकीपटू चा सामना करण्यात अपयशी ठरला. टीम डेविड जो मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. तो राशीदच्या षटकात फक्त दोन धावा करू शकला आणि पुढच्या षटकात बाद झाला. हार्दिक पंड्याने टीम डेविडला आधी फलंदाजीला पाठवून चूक केली ज्याचा मोठा फटका संघाला बसला आणि पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभवाचे एक कारण ठरले.

तिलक वर्माने टीम डेव्हिड नॉन स्ट्राईकला असताना धाव नाकारली

मुंबई इंडियन्स संघाचा मधल्या फळीतील फलंदाज तिलक वर्माने अनेकदा संघासाठी मोक्याच्या क्षणी धावा केल्या आहेत. पण या सामन्यात मात्र तो मोठं काही करू शकला नाही. पण त्याची एक चूक संघाला खूपच भारी पडली. राशिद खानच्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवर टीम डेविड ने एक धाव घेत तिलक वर्माला स्ट्राईक दिला. मुंबई इंडियन्सला विजयासाठी एक एक धाव खूप महत्त्वाची होती. तिसऱ्या चेंडूवर तिलक वर्माने मिडविकेट जवळ चेंडू खेळला, एक धाव चोरण्याची संधी असतानाही तिलक वर्माने टीम डेव्हिडला धाव घेण्यास नकार दिला.

तिलकने घेतलेला हा निर्णय पाहून समालोचकही चकित झाले. सामन्यानंतर जेव्हा सुनील गावस्करांनी हार्दिक पंड्याला याबाबत प्रश्न विचारला. तेव्हा हार्दिक पांड्या म्हणाला, “माझ्या मते तिलकला त्यावेळेस धाव न घेणे हेच योग्य वाटले असेल, मी त्याच्या या निर्णयाला पूर्णपणे पाठिंबा देतो. काही हरकत नाही अजून १३ सामने शिल्लक आहेत.”

गुजरातच्या नवोदित पदार्पण केलेल्या ओमरझाई, स्पेन्सरला दिल्या ४ विकेट्स

गुजरात टायटन संघाकडून आयपीएल २०२४ मध्ये अष्टपैलू अजमतुल्ला ओमरझाई आणि गोलंदाज स्पेन्सर जॉन्सन यांनी पदार्पण केले. या पदार्पणाच्या सामन्यातच या दोघांनी आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले. दोघांनीही प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या.

मुंबई इंडियन्सच्या संघाने पहिल्या डावात चांगले क्षेत्ररक्षण केले आणि गुजरातला जास्त धावा करण्याची संधी दिली नाही. पण याचे उलट चित्र फलंदाजी करताना दिसले. रोहित शर्मा आणि डेवाल्ड ब्रेविस सोडून इतर फलंदाजांनी एका मागून एक आपल्या विकेट्स टाकल्या. मुंबई इंडियन्सने खातेही उघडलेले नसताना ईशान किशन ओमरझाईच्या चेंडूवर झेलबाद झाला. ओमरझाईच्या पहिल्या तीनही चेंडूंवर ईशान किशन गडबडताना दिसला आणि अखेरीस चौथ्या चेंडूवर झेलबाद झाला. ओमरझाईने टाकलेला चेंडू बॅटची कड घेत साहाच्या हातात गेला आणि खातेही न उघडता ईशान किशनाला परतावे लागले. ओमरझाईचे पहिले तीन चेंडू पाहता किशनने सावधगिरीने पहिले षटक खेळणे गरजेचे होते.

मुंबई इंडियन्स कडून आयपीएल २०२४ मध्ये पदार्पण केलेला नमन धीर याने ओमरझाईच्या तिसऱ्या षटकात विस्फोटक फलंदाजी करत १९ धावा केल्या. पण सर्वच चेंडूंवर जोरदार फटकेबाजी करण्याच्या नादात तो शेवटच्या चेंडूवर शॉट मारायला चुकला आणि अखेरच्या चेंडूवर पायचीत झाला. गुजरात साठी हे षटक महागडे ठरले असले तरीही मुंबईला मोठा फटका या षटकात बसला.

डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्यासाठी गुजरातने स्पेन्सर जॉन्सन वर विश्वास दाखवला. गुजरातकडून अठरावे षटक टाकण्यासाठी स्पेन्सर जॉन्सन आला आणि त्याच्या पहिल्याच चेंडूवर तिलक वर्माने दणदणीत षटकार लगवला. पण मुंबई इंडियन्स आणि तिलकचा हा आनंद जास्त काळ टिकला नाही. पुढच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा नादात तिलक वर्मा बाउंड्री लाईन जवळ अभिनव मनोहर कडून झेलबाद झाला. तर याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर त्याच्याकडून झेलबाद झाला. संघाला गरज असताना सावध खेळी करणे गरजेचे होते पण मुंबई इंडियन्सचे फलंदाज मात्र गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांसमोर हतबल दिसले.

आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सने चाहत्यांचा मोठा रोष ओढवून घेतला आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यांमध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघ कशी कामगिरी करणार यावर सर्वांचे लक्ष असणार आहे.