भारत-पाकिस्तान तणावामुळे आयपीएल २०२५ स्पर्धा एका आठवड्याकरता स्थगित करण्यात आली होती. यानंतर आता १७ मे पासून स्पर्धेला परत सुरूवात होत आहे. १७ मे पासून सुरू होणाऱ्या स्पर्धेचा अंतिम सामना ३ जून रोजी खेळवला जाईल. स्थगितीमुळे अनेक खेळाडू मायदेशी परतले होते. आता इंटरनॅशनल सामने असल्यामुळे काही विदेशी खेळाडू स्पर्धेत पुन्हा परतणार नाहीत. त्यामुळे बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे.

आयपीएलवरील स्थगिती आणि नवीन वेळापत्रकामुळे, अनेक विदेशी खेळाडू मायदेशी परतले. पण राष्ट्रीय कर्तव्यामुळे अनेक खेळाडूंना पुन्हा आयपीएल खेळण्याकरता परतणं शक्य नसल्याचे समोर आले. २६ मे नंतर बरेच खेळाडू आयपीएलमध्ये खेळू शकणार नाहीयेत. हे लक्षात घेता, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आयपीएल फ्रँचायझींना तात्पुरते बदली खेळाडू म्हणून करारबद्ध करण्याची परवानगी देत असल्याचे वृत्त क्रिकबझने दिले आहे.

आयपीएल संघांमध्ये जे खेळाडू परतू शकणार नाहीयेत, त्यांच्या जागी संघ तात्पुरते बदली खेळाडू घेऊ शकणार आहेत. दरम्यान हे खेळाडू आगामी सीझनकरता संघांचा भाग नसतील आणि त्यांना रिटेनही करता येणार नाही, पुढील हंगामापूर्वी हे खेळाडू लिलावात सहभागी होतील.

आयपीएलचे नवीन वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर, अनेक विदेशी खेळाडू भारतात परततील परंतु काही जण मात्र येऊ शकणार नाहीत. त्यापैकी प्रमुख खेळाडू म्हणजे मिचेल स्टार्क, जॅक फ्रेझर मॅकगर्क (दिल्ली कॅपिटल्स), जेमी ओव्हरटन (चेन्नई सुपर किंग्ज) ही नावं आहेत. त्यापैकी दिल्ली कॅपिटल्सने जेक फ्रेझर मॅकगर्कच्या जागी बदली खेळाडूची घोषणा केली आहे. वाचा सविस्तर बातमी

आयपीएलच्या नियमांनुसार, संघाचा भाग असलेल्या खेळाडूला दुखापत झाल्यास किंवा इतर कोणत्याही कारणास्तव हंगामातून माघार घेतल्यासच फ्रँचायझी एखाद्या खेळाडूला बदली खेळाडू म्हणून करारबद्ध करू शकते. पण संघाच्या १२ व्या लीग सामन्यानंतर बदली खेळाडू संघ घेऊ शकत नाहीत. पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे आणि म्हणूनच आयपीएलने नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे, असं रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. संघाला त्यांच्याकडे शिल्लक असलेल्या सामन्यांच्या संख्येनुसार बदली खेळाडू घेण्याची संधी मिळेल.

अहवालात माहिती दिल्याप्रमाणे, आयपीएलने फ्रँचायझीला बदली खेळाडूच्या नियमाबद्दल माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की बदली खेळाडूचे नियम नव्याने तयार केले गेले आहेत. त्यात म्हटलंय, जर काही विदेशी खेळाडू राष्ट्रीय कर्तव्य, वैयक्तिक कारणांमुळे किंवा दुखापती किंवा आजारपणामुळे उपलब्ध नसतील, तर स्पर्धेच्या शेवटपर्यंत तात्पुरत्या बदली खेळाडूंना परवानगी दिली जाईल. या खेळाडूंना रिटेन करता येणार नाही. त्यांना आयपीएल लिलाव २०२६ साठी त्यांची नावे नोंदवावी लागतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयपीएलने असंही स्पष्ट केलं की स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी बदली खेळाडू म्हणून आणलेल्या खेळाडूंना संघात कायम ठेवता येईल. आयपीएल थांबविण्याच्या ४८ तास आधी, दिल्ली कॅपिटल्सने सादिकुल्ला अटल, आरसीबीने मयंक अग्रवाल आणि राजस्थान रॉयल्सने लुहान ड्रे प्रिटोरियस आणि नांद्रे बर्गरला करारबद्ध केले होते, हे खेळाडू संघाचा भाग असतील.