IPL 2025 LSG vs RCB Match Update: आयपीएल २०२५ मध्ये दिल्ली-पंजाब सामना रद्द करण्यात आला. सामन्यातील ११ वे षटक सुरू असताना धरमशाला स्टेडियमचे फ्लडलाईट बंद झाले आणि नंतर बीसीसीआयने तांत्रिक बिघाडामुळे सामना रद्द करण्यात आल्याचे कळवले. जम्मू काश्मीरमध्ये दिलेला रेड अलर्ट आणि ब्लॅकआऊटमुळे सुरक्षेच्या कारणास्तव सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. पण आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचं काय, असा प्रश्न सर्वांना पडलाय. यावर अरूण धुमाळ यांनी उत्तर दिलंय.

शुक्रवारी आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना होणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव गुरूवारचा सामना रद्द करण्यात आला होता. पाकिस्तानसोबतच्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल सुरू ठेवायची की नाही यावर निर्णय घेण्यापूर्वी सरकारच्या सूचनांची वाट पाहत असल्याचे आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी गुरुवारी सांगितले.

शुक्रवारी लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना अद्याप तरी नियोजित वेळापत्रकानुसारच होईल, अशी माहिती अरूण धुमाळ यांनी दिली आहे. आयपीएलचे चेयरमन अरूण धुमाळ यांनी पीटीआयला सांगितलं, “आम्ही सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेत आहोत. सध्या आम्हाला सरकारकडून कोणतेही निर्देश मिळालेले नाहीत. सर्व गोष्टी लक्षात घेऊन कोणताही निर्णय घेतला जाईल.”

शुक्रवारी लखनौमध्ये होणाऱ्या सामन्याबद्दल विचारले असता त्यांनी माहिती दिली की, “हो, सध्यासाठी तरी हा सामना नियोजित वेळेनुसार सुरू असले. पण स्पष्टपणे ही एक स्थिती बदलू शकते आणि सर्व भागधारकांचे हित लक्षात घेऊन कोणताही निर्णय घेतला जाईल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धरमशालामधील सामन्यानंतर, दोन्ही संघांचे खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी पठाणकोट येथून एका विशेष ट्रेनने दिल्लीला येतील, जे धरमशालापासून सुमारे ८५ किमी अंतरावर आहे. दोन्ही संघ आणि इतर सर्व जण पठाणकोटला रस्ते मार्गाने जातील. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून धरमशाला येथील एकमेव विमानतळ, तसेच शेजारच्या कांगडा आणि चंदीगडमधील विमानतळ सध्या बंद आहेत.