दुबईच्या मैदानावर खेळवण्यात येत असलेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद या सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांनी आश्वासक कामगिरी केली आहे. पहिल्यांदा गोलंदाजी करताना हैदराबादच्या संघाने मोक्याच्या क्षणी राजस्थान रॉयल्सला धक्के देत सामन्यावर आपलं वर्चस्व राखलं. निर्धारीत २० षटकांत राजस्थानचा संघ १५४ धावांपर्यंत मजल मारु शकला. हैदराबादकडून तेराव्या हंगामातला पहिलाच सामना खेळणाऱ्या होल्डरने आपली चमक दाखवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बसिल थम्पिच्या जागेवर होल्डरला आज संघात स्थान मिळालं. आपल्याला मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलत होल्डरने राजस्थानच्या ३ फलंदाजांना माघारी धाडलं. जेसन होल्डरने २०१६ साली अखेरचा सामना खेळला ज्यात त्याला २ बळी मिळाले होते. यानंतर तब्बल ४ वर्षांनी मिळालेली संधी वाया न घालवता होल्डरने आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं.

नाणेफेक जिंकून सनराईजर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉबिन उथप्पा आणि बेन स्टोक्स ही जोडी मैदानावर स्थिरावतेय असं वाटत असतानाच उथप्पा एकेरी धाव घेताना धावबाद झाला. यानंतर संजू सॅमसन आणि स्टोक्स यांनी छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी हैदराबादच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत धावा जमवण्याकडे आपला भर दिला. गेल्या काही सामन्यांपासून फॉर्म गमावून बसलेला संजू सॅमसन या सामन्यात चांगलाच रंगात आला होता. जेसन होल्डरने सॅमसनला त्रिफळाचीत करुन हैदराबादला दुसरं यश मिळवून दिलं. यानंतर लागोपाठ बेन स्टोक्सही राशिद खानच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला.

मोक्याच्या क्षणी राजस्थानचे दोन फलंदाज माघारी परतल्यामुळे संघ पुन्हा एकदा बॅकफूटवर फेकला गेला. जोस बटवर आणि स्टिव्ह स्मिथ जोडीकडून राजस्थानला अपेक्षा होत्या…परंतू विजय शंकरच्या गोलंदाजीवर बटलर नदीमकडे झेल देत माघारी परतला. फटकेबाजीच्या करण्याच्या षटकांमध्ये राजस्थानचे नवीन फलंदाज मैदानात असल्यामुळे धावगतीवर अंकुश बसला. रियान परागने फटकेबाजी करत धावा जमवण्याचा प्रयत्न केला. परंतू दुसऱ्या बाजूने स्टिव्ह स्मिथ धावा जमवण्याच्या प्रयत्नात मोठा फटका खेळताना सीमारेषेवर मनिष पांडेकडे झेल देऊन माघारी परतला. जेसन होल्डरने त्याच षटकात रियान परागला माघारी धाडत राजस्थानला आणखी एक धक्का दिला. हैदराबादकडून जेसन होल्डरने ३, विजय शंकर आणि राशिद खान यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

Web Title: Ipl 2020 jason holder shines in his 1st match takes 3 wickets psd
First published on: 22-10-2020 at 21:33 IST