इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किंग्ज इलेव्हन पंजाबची इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) गुरुवारी बेंगळूरु रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध लढत होत आहे. आव्हान टिकवण्यासाठी ही लढत जिंकणे पंजाबसाठी गरजेचे आहे. पंजाबसाठी जमेची बाजू म्हणजे ख्रिस गेलचे पुनरागमन या लढतीतून होत आहे.

यंदाच्या ‘आयपीएल’ हंगामात पहिलीच लढत गेल खेळणार आहे. प्रकृतीच्या कारणास्तव गेल ‘आयपीएल’ हंगामात आतापर्यंत खेळू शकला नाही. पंजाबला गेलकडून मोठय़ा अपेक्षा असणार आहेत. पंजाबचा एकमेव विजय बेंगळूरुविरुद्ध आहे ही त्यातल्या त्यात जमेची बाजू आहे. २४ सप्टेंबरला उभय संघांमध्ये लढत झाली होती. गेलसाठी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे शारजाचे मैदान ठरू शकते. शारजा क्रिकेटचे मैदान हे तुलनेने लहान असल्याने गेलला चौकार आणि षटकार फटकावण्याची संधी आहे. मात्र अर्थातच ४१ वर्षीय गेलला फटकेबाजीच्या दृष्टीने लगेचच लय सापडते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

पंजाब संघाकडे यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणारे के. एल. राहुल (३८७) आणि मयांक अगरवालसारखे (३३७) सलामीवीर आहेत. मात्र तरीदेखील गुणतालिकेत पंजाबचा संघ सात सामन्यांतून अवघ्या दोन गुणांसह अखेरच्या स्थानावर आहे. पंजाबची गोलंदाजी ही मोहम्मद शमी आणि रवी बिश्नोईवर सर्वाधिक अवलंबून आहे. अन्य गोलंदाजांना विशेष कामगिरी दाखवता आलेली नाही.

दुसरीकडे बेंगळूरु संघाने कोलकाता नाइट रायडर्सला गेल्या लढतीत नमवत आत्मविश्वास उंचावल्याचे दाखवून दिले.

वॉशिंग्टन सुंदर आणि यजुवेंद्र चहल ही फिरकीपटूंची प्रभावी जोडी बेंगळूरुची मुख्य ताकद आहे. देवदत्त पडिक्कल, आरोन फिंच, विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स या अव्वल फलंदाजांची बॅट तळपली तर बेंगळूरुला रोखणे अवघड आहे.

*  वेळ : सायं.७.३०वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १.

मराठीतील सर्व आयपीएल २०२० बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2020 kings xi punjab against bangalore royal challengers today abn
First published on: 15-10-2020 at 00:24 IST