आयपीएलचा तेरावा हंगाम आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. १९ सप्टेंबरला गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी कसून सराव करत आहेत. मुंबई इंडियन्सच्या संघात यंदा रोहित शर्मा, क्विंटन डी-कॉक आणि ख्रिस लिन असे ३ मातब्बर खेळाडू असल्यामुळे सलामीला कोणत्या जोडीला पसंती द्यायची हा यक्षप्रश्न मुंबईच्या संघ व्यवस्थापनासमोर होता. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने या प्रश्नाचं उत्तर दिलं असून तेराव्या हंगामात आपण सलामीला येणार असल्याचं जाहीर केलं आहे. सलामीच्या सामन्याआधी व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्स दरम्यान रोहितने याबद्दल माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मी गेल्या वर्षी संपूर्ण स्पर्धेत सलामीला आलो होतो आणि यंदाही मीच सलामीला येणार आहे. पण संघाला जशी गरज असेल तसे सर्व पर्याय मी खुले ठेवणार आहे.” मुंबईकडून सलामीला कोण येणार या विचारलेल्या प्रश्नाला रोहित शर्माने उत्तर दिलं. ख्रिस लिन संघात आल्यामुळे मुंबई इंडियन्स क्विंटन डी-कॉक सोबत रोहित शर्माला संधी देणार की ख्रिस लिनला संधी देणार यावरुन बरीच चर्चा सुरु होती. अखेरीस या चर्चेला रोहित शर्मानेच पूर्णविराम दिला आहे. एखाद्या सामन्यात प्रयोग करायचा ठरल्यास ख्रिस लिन किंवा इशान किशन यासारख्या खेळाडूंना सलामीला संधी देण्यात येईल असंही रोहितने स्पष्ट केलंय.

भारतात करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता यंदाच्या स्पर्धेचं आयोजन हे युएईत करण्यात आलेलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्स हा स्पर्धेतला सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखला जातो. मुंबईच्या नावावर आतापर्यंत ४ विजेतेपदं जमा आहेत, तर चेन्नईने ३ वेळा स्पर्धेत बाजी मारलेय. अशा परिस्थितीत यंदाच्या हंगामात दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांच्या लढाईत कोण बाजी मारतंय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Web Title: Rohit sharma confirms opening the innings this season but ready to keep other options open psd
First published on: 17-09-2020 at 14:37 IST