ईडन गार्डन्सवर घरच्या क्रिकेटरसिकांच्या साक्षीने गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सने बलाढय़ मुंबई इंडियन्सचा ७ विकेट्स राखून पराभव केला आणि आयपीएल क्रिकेट स्पध्रेत शानदार सलामी नोंदवली. कर्णधार गौतम गंभीरने या विजयाची पायाभरणी केली, तर सूर्यकुमार यादवने कळस चढवला.
विजयासाठी १६९ धावांचे आव्हान स्वीकारणाऱ्या कोलकाताची सुरुवात खराब झाली. रॉबिन उथप्पाने (९) निराशा केल्यानंतर गंभीर आणि मनीष पांडे (४०) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी केली. गंभीरने ४३ चेंडूंत ७ चौकार आणि एका षटकारासह ५७ धावा केल्या. त्यानंतर अखेरच्या पाच षटकांत कोलकाताला विजयासाठी ४० धावांची आवश्यकता होती. परंतु जसप्रित बुमराहच्या १७व्या षटकात सूर्यकुमारने दोन षटकार आणि युसूफ पठाणने एक षटकार ठोकून एकूण २० धावा काढल्या आणि सामन्याचे पारडे आपल्याकडे झुकवले. सूर्यकुमारने फक्त २० चेंडूंत एक चौकार आणि तब्बल ५ षटकारांची आतषबाजी करत नाबाद ४६ धावा केल्या. त्याला पठाणने छान साथ दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद ४९ धावांची भागीदारी केली.
तत्पूर्वी, ईडन गार्डन्सवर रोहित शर्माने लाजवाब फटकेबाजीचे प्रदर्शन करीत मुंबईला ३ बाद १६८ धावा काढून दिल्या. रोहितने ६५ चेंडूंत १२ चौकार आणि ४ चौकारांच्या साथीने नाबाद ९८ धावा केल्या.
कोलकाताने नाणेफेक जिंकल्यावर मुंबईला प्रथम फलंदाजीची संधी दिली. परंतु आरोन फिंच (५), आदित्य तरे (७) आणि अंबाती रायुडू (०) झटपट तंबूत परतल्यामुळे मुंबईची ३ बाद ३७ अशी केविलवाणी अवस्था झाली. मॉर्नी मॉर्केलने यात (२/१८) महत्त्वाची भूमिका बजावली. ईडन गार्डन्सवर गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात २६४ धावांची एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वविक्रमी खेळी साकारणाऱ्या रोहितने मग पुन्हा एकदा या मैदानावर आपला करिष्मा दाखवला. रोहितने आयपीएलमधील आपले २२वे अर्धशतक साकारले. रोहितला तोलामोलाची साथ लाभली ती न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू कोरे अँडरसनची. अँडरसनने ४ चौकार आणि ३ षटकारांसह ४१ चेंडूंत नाबाद ५५ धावा करून चौथ्या विकेटसाठी १३१ धावांची भागीदारी रचली.
गोलंदाजीच्या शैलीचे शुद्धिकरण झाल्यानंतर अपेक्षा उंचावणाऱ्या सुनील नरिनने ४ षटकांत २८ धावा दिल्या, मात्र त्याला एकही बळी मिळवता आला नाही. तर शाकिब अल हसनच्या गोलंदाजीवर ४८ धावा मुंबईच्या संघाने चोपल्या.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : २० षटकांत ३ बाद १६८ (रोहित शर्मा नाबाद ९८, कोरे अँडरसन नाबाद ५५; मॉर्नी मॉर्केल २/१८) पराभूत वि. कोलकाता नाइट रायडर्स : १८.३ षटकांत ३ बाद १७० (गौतम गंभीर ५७, मनीष पांडे ४०, सूर्यकुमार यादव नाबाद ४६; कोरे अँडरसन १/२१)
सामनावीर : मॉर्नी मॉर्केल