इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या १५ व्या हंगामाला सुरुवात झालेली आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात या हंगामातील पहिला सामना रंगला. या रोमहर्षक लढतीमध्ये चेन्नईच्या फलंदाजांकडून निराशाजनक कामिगिरी झाली. मात्र महेंद्रसिंह धोनीने आयपीएलमध्ये एक नवा इतिहास रचला. धोनी आयपीएलमध्ये पन्नास धावा म्हणजेच अर्धशतक करणारा सर्वात जास्त वय असलेला भारतीय क्रिकेटपटू आणि आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणारा तिसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. धोनीने ३८ चेंडूत नाबाद ५० धावा केल्या. धोनीच्या खेळीमुळे सीएसकेचा संघ कोलकाता नाईट रायडर्ससमोर १३१ धावा करू शकला.

धोनीच्या अगोदर गिलख्रिस्ट आणि ख्रिस गेलचा क्रमांक –

महेंद्रसिंग धोनीने काल (शनिवार) केकेआर विरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावले, तेव्हा त्याचे वय ४० वर्षे २६२ दिवस होते. धोनीपूर्वी, आयपीएलमध्ये सर्वात वयस्कर म्हणून अर्धशतकं झळकावणाऱ्यांमध्ये अॅडम गिलख्रिस्ट आणि ख्रिस गेल आहेत. अॅडम गिलख्रिस्टने वयाच्या ४१ वर्षे १८१ दिवसांत अर्धशतक झळकावले. तर, ख्रिस गेलने वयाच्या ४१ वर्षे ३९ दिवसांत अर्धशतक केले होते.

सचिन आणि द्रविडला धोनीने टाकलं मागे –

त्याचबरोबर आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या सर्वाधिक वयाच्या अव्वल ५ खेळाडूंवर नजर टाकली तर ५ पैकी ३ खेळाडू हे भारतीय आहेत. धोनीनंतर राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांनी देखील अधिक वयात आयपीएलमध्ये अर्धशतके झळकावली आहेत. राहुल द्रविडने वयाच्या ४० वर्षे ११६ दिवसांत अर्धशतक केले, तर सचिन तेंडुलकरने वयाच्या ३९ वर्षे ३६२ दिवसांत अर्धशतक झळकावले होते.

या पाच खेळाडूंपैकी आता फक्त महेंद्रसिंह धोनी आयपीएल खेळत आहे. धोनीने CSK चे कर्णधारपद सोडले आहे आणि तो आता CSK साठी फक्त यष्टिरक्षक आणि फलंदाज म्हणून खेळत आहे. धोनीची ही शेवटची आयपीएल असू शकते, असेही सांगितले जात आहे.

आयपीएलच्या पंधाराव्या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केलं. चेन्नईने दिलेलं १३२ धावांचं लक्ष्य केकेआरने लिलया पेलत सामना खिशात घातला. केकेआरच्या या विजयासाठी अजिंक्य रहाणे, सॅम बिलिंग्स यांनी मोलाची कामगिरी केली.