Dream11 IPL 2020 MI vs RR Live Updates: राजस्थानविरूद्धच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकली असून मुंबईचा संघ प्रथम फलंदाजी करत आहे. मुंबईच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राजस्थानच्या संघात मात्र तीन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. अनुभवी रॉबिन उथप्पा आणि जयदेव उनाडकट यांना संघाबाहेर करण्यात आलं आहे. या सामन्यात फलंदाजीसाठी मैदानावर पाय ठेवताच रोहित शर्माने एक विक्रम केला.

राजस्थानविरूद्ध जेव्हा रोहित मैदानावर उतरला तेव्हा तो IPL स्पर्धेत सर्वाधिक सामना खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रैनासोबत दुसऱ्या स्थानी पोहोचला. रोहितच्या नावावर १९३ सामने होते. तर रैनाच्या नावावर १९४ सामने आहेत. आजचा सामना हा रोहितचा १९४वा सामना ठरला. त्यामुळे रोहित हा यादीत रैनासोबत संयुक्तपण दुसऱ्या स्थानी विराजमान झाला. धोनीने पंजाबविरूद्ध रविवारी झालेल्या सामन्यात रैनाला मागे टाकलं होतं. तो धोनीचा १९५ सामना होता. धोनी या यादीत अव्वलस्थानी आहे.

IPL 2020 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने आतापर्यंत ५ पैकी ३ सामन्यात विजय मिळवला आहे. ते ६ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहेत. तर राजस्थानचा संघ ४ पैकी २ सामने जिंकला आहे. त्यामुळे राजस्थानचा संघ ४ गुणांसह पाचव्या स्थानी आहे. मुंबईचा संघ सध्या दमदार लयीत आहे, पण राजस्थान रॉयल्सला पुन्हा विजयपथावर आणण्यासाठी संघातील भारतीय खेळाडूंना कामगिरी उंचावण्याची नितांत गरज आहे. परंतु, मुंबई-राजस्थान यांच्यातील गेल्या चार सामन्यात ४-०ने राजस्थानचा संघ आघाडीवर आहे.