*  दिनेश कार्तिक, रोहित शर्माची दमदार अर्धशतके
*  वानखेडेवर मुंबई इंडियन्सची झोकात नांदी
*  दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सलग तिसरा पराजय
वानखेडे स्टेडियमवरील पहिल्यावहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ ‘दुनिया हिला देंगे’ या आपल्या ब्रीदवाक्याला जागला. फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर दिनेश कार्तिक आणि रोहित शर्मा यांनी दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. तब्बल २१ चौकार आणि १० षटकारांची मुंबई इंडियन्सची चौफेर आतषबाजी क्रिकेटरसिकांना मंत्रमुग्ध करणारी ठरली. मुंबईच्या २०९ या आव्हानात्मक धावसंख्येपुढे दिल्लीला जेमतेम ९ बाद १६५ धावा करता आल्या. त्यामुळे मुंबई इंडियन्सने ४४ धावांनी रुबाबात विजय मिळवत आयपीएलच्या सहाव्या पर्वात आपल्या खात्यावर दुसऱ्या विजयाची नोंद केली.
मागील वर्षी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा डाव फक्त ९२ धावांत आटोपला होता. त्यानंतर दिल्लीने आरामात विजयाची नोंद केली होती. त्या सामन्यात सर्वाधिक ३२ धावा काढणाऱ्या वीरेंद्र सेहवागची उणीव दिल्लीला तीव्रतेने भासली. पण डेव्हिड वॉर्नरने ३७ चेंडूंत ५ चौकार आणि ४ षटकारासह ६१ धावा काढत दिल्लीच्या विजयाच्या आशा तेवत ठेवल्या होत्या. त्याने मनप्रीत जुनेजासोबत तिसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. पण मिचेल जॉन्सनने त्याचा अडसर दूर करीत सामना मुंबईकडे झुकवला. जुनेजाने झुंजार फलंदाजी केली. पण त्याचे अर्धशतक दुर्दैवाने एका धावेने हुकले.
त्याआधी, नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी पत्करणाऱ्या मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. रिकी पाँटिंग आणि सचिन तेंडुलकर हे रथीमहारथी धारातीर्थी पडल्यानंतर मुंबईची २ बाद १ अशी केविलवाणी अवस्था झाली होती. तेव्हा हाच मुंबईचा संघ दोनशेचा पल्ला ओलांडेल असे कुणालाही वाटले नव्हते. पण दिनेश कार्तिक आणि रोहित शर्माच्या बेफाम फटकेबाजीने ते प्रत्यक्षात अवतरले. ‘टेन्शन कायको लेने का..’ हे सूत्र जपत कार्तिकने दिल्लीच्या गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढवला. त्यानंतर रोहितनेही त्याचे अनुकरण केले. या जोडीने ८० चेंडूंत १३२ धावांची धडाकेबाज भागीदारी करीत वानखेडेवरील क्रिकेटरसिकांना खूष केले.
आयपीएलच्या सहाव्या पर्वात कार्तिकने आपल्या सातत्यपूर्ण फलंदाजीची अदाकारी पेश करताना ४८ चेंडूंत १४ चौकार आणि २ षटकारांसह ८६ धावा केल्या. याआधीच्या दोन सामन्यांत कार्तिकने ६० आणि ३७ धावा केल्या होत्या. त्याला साथ देणारा रोहित पहिल्या दोन सामन्यांत (अनुक्रमे ८ आणि ११) धावांसाठी झगडत होता. परंतु मंगळवारी रोहितने ‘आयपीएलस्टाइल भरारी’ घेताना ४ चौकार आणि ५ टोलेजंग षटकारांसह नाबाद ७४ धावा केल्या. इरफान पठाणच्या १९व्या षटकात अंबाती रायुडूनेही (२४) धावांची बरसात करीत त्या षटकात २२ धावा कुटल्या. त्यामुळेच मुंबईला ५ बाद २०९ अशी धावसंख्या रचता आली.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : २० षटकांत ५ बाद २०९ (दिनेश कार्तिक ८६, रोहित शर्मा नाबाद ७४, अंबाती रायुडू २४; आशिष नेहरा २/४९) विजयी विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकांत ९ बाद १६५ (डेव्हिड वॉर्नर ६१, मनप्रीत जुनेजा ४९, मॉर्नी मॉर्केल नाबाद २३; मिचेल जॉन्सन २/४९, प्रग्यान ओझा २/३४, किरॉन पोलार्ड २/३५).
सामनावीर : दिनेश कार्तिक.
भ्रमाचा भोपळा!
क्रिकेटच्या दुनियेतील अनभिषिक्त सम्राट सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटचे फलंदाजीचे वैभव रिकी पाँटिंग यांच्यावर मुंबई इंडियन्सने यंदा सलामीची धुरा सोपवली. सचिन आणि रिकी दोघेही वयाच्या चाळिशीकडे झुकू लागले असले तरी ट्वेन्टी-२०च्या वेगवान क्रिकेटमध्ये ते मुंबईच्या डावाला भक्कमपणे आकार देतील अशी आशा होती. पण पहिल्या सामन्यानंतर ही जोडी दोन्ही सामन्यांत अपयशी ठरली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पाँटिंग (२८) आणि सचिन (२३) या जोडीने ५२ धावांची सलामी नोंदवली होती. मग चेन्नईविरुद्ध सचिनने ० आणि पाँटिंगने ६ धावा केल्या, तर या जोडीने फक्त ३ धावांची सलामी नोंदवली होती. पण मंगळवारी या जोडीला भोपळाही फोडता आला नाही. पाँटिंगने ० आणि सचिनने १ धाव केली. दिग्गजांच्या सलामी सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरल्यामुळे आगामी सामन्यात मुंबई इंडियन्सला सलामीसाठी नव्या पर्यायाचा विचार करावा लागणार आहे.
 
मलिंगा-मॉर्केल आले रे आले!
आयपीएलचे सहावे पर्व वानखेडे स्टेडियमच्या व्यासपीठावर येऊन ठेपले तेच उत्साहाचे वातावरण घेऊन. पण फलंदाजांना धडकी भरवणारा लसिथ मलिंगा आणि गतवर्षी सर्वाधिक बळी मिळवत ‘पर्पल कॅप’ जिंकणारा मॉर्नी मॉर्केल आयपीएलमध्ये परतले. त्यामुळे मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्या सामन्यातील लज्जत आणि आयपीएलमधील रंगत वाढली. दुखापतीमुळे मलिंगा पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळू शकला नव्हता, तर दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक क्रिकेट स्पध्रेमुळे मॉर्केल उशिराने भारतात आला.
 वानखेडेवर आयपीएल जत्रोत्सव!
सालाबादप्रमाणे यंदाही वानखेडेवर आयपीएलच्या सामन्यांच्या निमित्ताने जत्रोत्सवाचे वातावरण होते. चर्चगेट स्थानकाच्या पूर्व-पश्चिम दोन्ही बाजूंच्या रस्त्यांवर, चौपाटीवर निळ्या पोशाखातील मुंबई इंडियन्सचा चाहतावर्ग मोठय़ा प्रमाणात पहिल्या सामन्यात आला. अपेक्षेप्रमाणेच वानखेडेवरील सलामी ही हाऊसफुल्लने झाली. चीअरलीडर्स, डीजे, मुंबई इंडियन्सची बोलगीते आदी साऱ्यांसोबत स्टेडियममधील क्रिकेटरसिकसुद्धा ठेका धरत होते.
के. प्रशांत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai indians won by 44 runs against delhi daredevils
First published on: 10-04-2013 at 03:50 IST