युवा व अनुभवी खेळाडूंमधील योग्य समन्वय हेच आमच्या संघाचे गमक आहे, असे चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने येथे सांगितले.
चेन्नई संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल धोनी म्हणाला की, ‘‘आमच्या संघातील अनुभवी खेळाडूंना युवा खेळाडूंची खूप चांगली साथ मिळाली आहे. तसेच संघाच्या सपोर्ट स्टाफचेही आम्हाला चांगले सहकार्य लाभले आहे. एखाद्या चांगल्या युवा खेळाडूला स्थान देण्यासाठी अनुभवी व वरिष्ठ खेळाडूंना वगळणे ही खूपच अवघड कामगिरी असते. आमच्या संघात रवींद्र जडेजा, ईश्वर पांडे, मोहित शर्मा तसेच पवन नेगी यांच्यासारखे गुणवान युवा खेळाडू आहेत. त्यांना संधी देताना संघातील काही वरिष्ठ खेळाडूंना वगळावे लागते. हा निर्णय घेताना कर्णधार म्हणून मला खूप दडपण ठेवीत घ्यावा लागतो. ब्रँडन मॅक्क्युलमला वगळताना मला खूप त्रास झाला होता. मात्र काही वेळा संघहितासाठी असे निर्णय घ्यावेच लागतात.’’
धोनी पुढे म्हणाला की, ‘‘संघातील वरिष्ठ खेळाडू सुरेश रैना व माईक हसी यांच्यासारख्या वरिष्ठ खेळाडूंकडून युवा खेळाडूंना बरेच काही शिकण्याची संधी आहे. विशेषत: अडचणीत सापडलेल्या संघास विजयाच्या मार्गावर आणण्यासाठी कोणती क्लृप्ती वापरायची याचे ज्ञान या अनुभवी खेळाडूंकडूनच युवा खेळाडूंना मिळू शकते.’’
धोनी हा विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असताना त्याला मुलगी झाली होती. त्याबद्दल तो म्हणाला की, ‘‘तिचा जन्म झाला, त्या वेळी मी ऑस्ट्रेलियात होतो. त्यामुळे तिला पाहण्यासाठी मी खूप उत्सुक झाला होतो.