रविवार असूनही चाहत्यांना आयपीएलमध्ये रटाळ सामन्यांचा आस्वाद घ्यावा लागला. राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या सारख्याच ताकदीच्या संघांमध्ये रात्री झालेल्या सामन्यात रडत-खडत का होईना, पण राजस्थानने विजय साकारला. गोलंदाजांच्या शिस्तबद्ध कामगिरीवर शेन वॉटसन, अजिंक्य रहाणे आणि संजू सॅमसन यांनी सुरेख खेळी करून कळस चढवण्याचे काम केले.
पंजाबचे १२५ धावांचे आव्हान पार करताना शेन वॉटसन आणि अजिंक्य रहाणे या सलामीवीरांनी राजस्थानला शानदार सुरुवात करून दिली. या दोघांनी ४.३ षटकांत ४३ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे सामना एकतर्फी होणार आणि राजस्थान सहज विजयाला गवसणी घालणार, असे वाटले होते. पण वॉटसन (३२) माघारी परतल्यावर राहुल द्रविड (९), स्टुअर्ट बिन्नी (०) आणि ब्रॅड हॉज (१५) यांना पंजाबच्या गोलंदाजांसमोर मोठी खेळी करता आली नाही. रहाणे आणि संजू सॅमसन यांनी अखेपर्यंत किल्ला लढवला. मात्र सामना अखेरच्या षटकापर्यंत लांबला. शेवटच्या षटकांत पाच धावांची आवश्यकता असताना सॅमसनने पीयूष चावलाच्या पहिल्या चेंडूवर दोन धावा काढल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर  चौकार लगावून राजस्थानचा तिसरा विजय साकारला. रहाणेने तीन चौकारांसह नाबाद ३४ धावा फटकावल्या. त्याला चांगली साथ देत सॅमसनने नाबाद २७ धावांची खेळी केली.
तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर किंग्ज इलेव्हन पंजाबच्या फलंदाजांनी शरणागती पत्करल्यामुळे पंजाबचा डाव १८.५ षटकांत १२४ धावांवर संपुष्टात आला. एस. श्रीशांत, सिद्धार्थ त्रिवेदी, जेम्स फॉल्कनर आणि केव्हॉन कूपर यांनी पंजाबचा डाव पोखरला.
श्रीशांतने दुसऱ्या षटकांत दोन विकेट्स मिळवत प्रथम गोलंदाजी करण्याचा कर्णधार राहुल द्रविडचा निर्णय सार्थ ठरविला. त्यानंतर फॉल्कनरने मनन व्होरा याचा काटा काढल्यामुळे पंजाबची ३ बाद १० अशी अत्यंत बिकट अवस्था झाली होती. हसी आणि गुरकीरत सिंग (१०) यांनी चौथ्या विकेटसाठी ३५ धावांची भर घातली. पण एकापाठोपाठ विकेट्स पडत गेल्यामुळे पंजाबच्या डावाला स्थैर्यच मिळाले नाही. हसी आणि अझर मेहमूद यांनी फटकेबाजी केल्यामुळे पंजाबला शतकी पल्ला गाठता आला. हसीने चार चौकार आणि एक षटकारासह ४१ धावा फटकावल्या. मेहमूदने २३ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
किंग्ज इलेव्हन पंजाब : १८.५ षटकांत सर्व बाद १२४ (डेव्हिड हसी ४१, अझर मेहमूद २३; एस. श्रीशांत २/२०, सिद्धार्थ त्रिवेदी २/२१) पराभूत विरुद्ध राजस्थान रॉयल्स : १९.२ षटकांत ४ बाद १२६ (अजिंक्य रहाणे नाबाद ३४, शेन वॉटसन ३२; प्रवीण कुमार २/१०)
सामनावीर : जेम्स फॉल्कनर.
ईऑन मॉर्गन, कोलकाता नाइट रायडर्स
ईडन गार्डन्सवर प्रेक्षकांचा अभूतपूर्व पाठिंबा होता. संघानेही या पाठिंब्याला जागत शानदार सांघिक कामगिरीचे प्रदर्शन करत विजय साकारला. कोलकाता नाइट रायडर्सचा पुढचा सामना मोहालीत.. आता मोहालीला रवाना होतोय!!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajastan is royal
First published on: 15-04-2013 at 02:55 IST