* राजस्थान रॉयल्सचा कोलकाता नाइट रायडर्सवर १९ धावांनी विजय
* रॉयल्सची भेदक गोलंदाजी
* मॉर्गनची एकाकी झुंज व्यर्थ
नाव मोठे, लक्षण खोटे ही म्हण कोलकाता नाइट रायडर्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध पुरेपूर सिद्ध केली. गंभीर, कॅलिस, तिवारी, युसुफ पठाण अशी तगडी फौज .. आणि लक्ष्य १४५ धावांचे.. मात्र सिद्धार्थ त्रिवेदी,राहुल शुक्ला आणि केव्हॉन कूपर या त्रिकुटाच्या भेदक गोलंदाजीपुढे त्यांनी शरणागती पत्करली .. इऑन मॉर्गनने ५१ धावांची एकाकी झुंज दिली मात्र ती पुरेशी ठरली नाही आणि राजस्थानने १९ धावांनी विजय मिळवला.
माफक लक्ष्याचा पाठलाग करताना नाइट रायडर्सची सुरुवात खराब झाली. राहुल शुक्लाने लागोपाठच्या चेंडूवर मनविंदर बिस्ला (१) आणि जॅक कॅलिस (०) या दोघांना स्वस्तात बाद करत नाइट रायडर्सना धक्का दिला. गौतम गंभीर आणि मनोज तिवारीने पडझड थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र सिद्धार्थ त्रिवेदीने मनोज तिवारी (१४) आणि गौतम गंभीरला (२२) एकाच षटकात माघारी धाडत नाइट रायडर्सच्या डावाला खिंडार पाडले. तिवारी पायचीतची शिकार ठरला तर गंभीरचा उजव्या यष्टीबाहेरचा चेंडू मारण्याचा प्रयत्न दिनेश याग्निकच्या अफलातुन झेलने संपुष्टात आणला. युसुफ पठाणनेही तंबूत जाण्याची घाई दाखवली, त्याला भोपळाही फोडता आला नाही. वाइड चेंडू खेळण्याचा मोह त्याच्या अंगलट आला. ५ बाद ४४ अशा संकटात सापडलेल्या नाइट रायडर्ससाठी इऑन मॉर्गन ही एकमेव आशा होती. त्याने ३ षटकार आणि ३ चौकारांच्या साथीने ३८ चेंडूत ५१ धावा करत नाइट रायडर्सच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र कूपरच्या गोलंदाजीवर मॉरगन त्रिफळाचीत होताच रॉयल्सच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. केव्हॉन कूपरने १५ धावांत ३ तर सिद्धार्थ त्रिवेदीने २३ धावांत ३ बळी टिपले.
तत्पूर्वी राजस्थान रॉयल्सने ब्रॅड हॉज आणि अजिंक्य रहाणे (३६) यांच्या उपयुक्त खेळींच्या जोरावर १४४ धावांची मजल मारली. दुखापतीतून सावरत पुनरागमन करणाऱ्या शेन वॉटसन (५) रहाणेच्या साथीने सलामीला आला. मात्र ब्रेट लीच्या चेंडूवर केवळ ५ धावा करून तो बाद झाला. द्रविड-रहाणे जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ३५ धावा जोडत डाव सावरला. द्रविड (१७) स्थिरावलाय असे वाटत असतानाच रजत भाटियाने त्याला त्रिफळाचीत केले. द्रविडच्या जागी आलेल्या स्टुअर्ट बिन्नीने ३ चौकारांसह दमदार सुरुवात केली मात्र आणखी एक जोरदार फटका लगावण्याच्या प्रयत्नांत तो लक्ष्मीरतन शुक्लाच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर रहाणेने ब्रॅड हॉजच्या (नाबाद ४६) साथीने चौथ्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी केली. ही जोडी नाइट रायडर्सची डोकेदुखी ठरणार असे चित्र असताना सुनील नरिनने रहाणेचा काटा काढला. रहाणेने ३ चौकार आणि एका षटकारासह ३६ धावा केल्या. रहाणेपाठोपाठ केव्हॉन कूपरलाही(०)  नरिनने शून्यावरच बाद केले. यानंतर ब्रॅड हॉजला साथ मिळाली दिनेश याग्निकची. या दोघांनी चार षटकांतच ३६ धावा फटकावल्या. हॉजने ७ चौकारांच्या साह्याने नाबाद ४६ धावांची खेळी करत रॉयल्सने सन्मानजनक धावसंख्या गाठली.  नरिनने २८ धावांत २ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक :
राजस्थान रॉयल्स : २० षटकांत ६ बाद १४४ (ब्रॅड हॉज नाबाद ४६, अजिंक्य रहाणे ३६, सुनील नरिन २/२८) विजयी विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स : १९ षटकांत १२५ (इऑन मॉरगन ५१, गौतम गंभीर २२, केव्हॉन कूपर ३/१५, सिद्धार्थ त्रिवेदी ३/२३)
 सामनावीर :  सिद्धार्थ त्रिवेदी
डेल स्टेन, हैदराबाद सनरायर्झसचा खेळाडू
संस्मरणीय सामना!!! प्रेक्षकांचा अभूतपूर्व पाठिंबा! याच्यापेक्षा थरारक काही असू शकत नाही. कॅमेरुन व्हाइटला सलाम..सुपर ओव्हरमध्ये २० धावा काढणे निश्तिचच जबरदस्त कामगिरी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajastan royal won by 19 suns against kolkatta night raiders
First published on: 09-04-2013 at 03:46 IST