मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात गुणतालिकेतील पहिल्या स्थानासाठी संघर्ष सुरू आहे. शिखर धवनच्या शानदार नाबाद अर्धशतकी (६९) खेळीच्या बळावर दिल्लीने २० षटकात ४ बाद १६२ धावा केल्या. शिखर धवनने दमदार खेळ करत ६ चौकार आणि १ षटकार लगावला. संपूर्ण २० षटके खेळून त्याने त्याने ५२ चेंडूत नाबाद ६९ धावा केल्या. त्याचे हे IPLमधील ३८वे अर्धशतक ठरले. याचसोबत शिखरने विराट कोहली, रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांच्या कामगिरीशी बरोबरी साधली. या तिघांच्या नावावरही ३८ अर्धशतके आहेत. आता धवनही सर्वाधिक IPL अर्धशतकांच्या यादीत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी आहे. तर हैदराबादचा कर्णधार वॉर्नर ४६ अर्धशतकांसह अव्वल स्थानी आहे.

नाणेफेक जिंकून दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या भेदक माऱ्याचा सामना करताना दिल्लीच्या डावाची सुरूवात खराब झाली. पहिल्याच षटकात सलामीवीर पृथ्वी शॉ ४ धावांवर माघारी परतला. ट्रेंट बोल्टने त्याला झेलबाद केले. थेट स्पर्धेच्या सातव्या सामन्यात पहिली संधी मिळालेला अजिंक्य रहाणे चांगली फलंदाजी करत होता. पण कृणाल पांड्याने त्याला पायचीत पकडलं. रहाणेने १५ चेंडूत १५ धावा केल्या. कर्णधार अय्यर आणि सलामी फलंदाज शिखर धवनने दिल्लीचा डाव सावरला आणि १४व्या षटकात संघाला शतक करून दिलं.

संघाच्या शतकानंतर धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर ३३ चेंडूत ४२ धावा काढून बाद झाला. कृणाल पांड्याने त्याला झेलबाद केले. त्यानंतर फटकेबाजीची जबाबदारी घेतलेला मार्कस स्टॉयनीस आणि शिखर धवन यांच्यावरून धाव घेण्यावरून गोंधळ झाला. याच गोंधळात स्टॉयनीस १३ धावांवर धावबाद झाला. पण सलामीवीर शिखर धवन शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने ५२ चेंडूत नाबाद ६९ धावा केल्या. त्याच्या खेळीत ६ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता.

मुंबईच्या कृणाल पांड्याने २ तर ट्रेंट बोल्टने १ गडी बाद केला.