ऋषिके श बामणे, लोकसत्ता
मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामाला धडाक्यात प्रारंभ झाला असून, पहिल्याच आठवडय़ात चाहत्यांना ‘सुपर ओव्हर’चा थरार आणि शतकी नजराणा पाहायला मिळाला. मात्र त्याचबरोबर २१ वर्षे अथवा त्याखालील वयाचे काही खेळाडूही ‘आयपीएल’ गाजवताना दिसत आहेत. यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये अशा एकूण २५ देशी-विदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
‘आयपीएल’मध्ये सहभागी झालेल्या भारतीय युवा खेळाडूंवर नजर टाकल्यास तीन-चार नावे लगेच डोळ्यांसमोर येतात ती म्हणजे दिल्लीकडून खेळणारा मुंबईकर पृथ्वी शॉ, बेंगळूरुचा देवदत्त पडिक्कल, कोलकाताचा शुभमन गिल आणि पंजाबचा रवी बिश्नोई. या चौघांनीही आपापल्या संघांच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. राजस्थानचे यशस्वी जैस्वाल, रियान पराग, हैदराबादचे प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा आणि बेंगळूरुचा वॉशिंग्टन सुंदर यांना अद्याप छाप पाडता आलेली नसली तरी येणाऱ्या लढतीत तेसुद्धा नक्कीच चमकतील, अशी अपेक्षा आहे. फिरकीपटू राहुल चहर आणि वेगवान गोलंदाज शिवम मावी यांनी अनुक्रमे मुंबई आणि कोलकातासाठी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे.
मात्र याशिवाय काही असेही युवा भारतीय खेळाडू आहेत, ज्यांना या हंगामात अद्याप तरी संधी मिळालेली नाही, परंतु त्यांच्यातही गुणवत्ता ठासून भरली आहे. मुंबईतील अनुकूल रॉय, प्रिन्स बलवंत राय सिंग, हैदराबादचा अब्दुल समद, राजस्थानचे कार्तिक त्यागी, मणिपाल लोमरोर, आकाश सिंग, अनुज रावत, पंजाबचे अर्शदीप सिंग, दर्शन नळकांडे, प्रभसिमरन सिंग आणि कोलकाताचा कमलेश नागरकोटी यांसारखे खेळाडू यंदा ‘आयपीएल‘च्या क्षितिजावर चमकण्यासाठी सज्ज आहेत.
राजस्थानमध्ये सर्वाधिक भरणा
चेन्नईच्या संघात एकाही युवा खेळाडूचा समावेश नाही, तर राजस्थानने सर्वाधिक सहा २१ वर्षांखालील खेळाडूंना संघात स्थान दिले आहे. त्याखाली अनुक्रमे पंजाब आणि कोलकाताचा क्रमांक येतो.
विदेशी युवा खेळाडूंवरही लक्ष
२१ वर्षांखालील विदेशी युवा खेळाडूंत फिरकीपटू संदीप लामिच्छाने, मुजीब उर रेहमान, टॉम बॅन्टन ही नावे समोर येतात. लामिच्छाने हा नेपाळचा कौशल्यवान फिरकीपटू असून मुजीबने नुकत्याच झालेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये सर्व फलंदाजांना फिरकीच्या तालावर नाचवले. तर इंग्लंडचा धडाकेबाज सलामीवीर बॅन्टनला कोलकाताकडून लवकरच खेळताना पाहायला मिळू शकते.
संघ खेळाडू
राजस्थान रॉयल्स ६
किंग्ज इलेव्हन पंजाब ५
कोलकाता नाइट रायडर्स ४
मुंबई इंडियन्स ३
सनरायजर्स हैदराबाद ३
दिल्ली कॅपिटल्स २
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु २
चेन्नई सुपर किंग्ज ०