Fans chanted Virat on seeing Naveen Ul Haq: आयपीएल २०२३ चा ६८ वा लीग सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. हा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर पार पडला. या रोमांचक सामन्यामध्ये लखनऊने एका धावेनी विजय मिळवला. त्याचबरोबर प्लेऑफमध्ये धडक मारली. दरम्यान लखनऊचा वेगवान गोलंदाज नवीन उल हकला पाहून स्टँडमध्ये बसलेल्या चाहत्यांनी कोहली, कोहली…च्या घोषणा देण्यास सुरुवात केली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणारा अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक विराट कोहलीसोबतच्या वादातून सतत चर्चेत असतो. लखनऊ आणि आरसीबी यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात मैदानावर काहीशी बाचाबाची झाली होती. यानंतर, आरसीबीच्या सामन्यादरम्यान नवीन उल हकने इन्स्टा स्टोरी शेअर केली होती, ज्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला होता.

कोहली, कोहली… अशा घोषणांचा व्हिडिओ व्हायरल –

लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना सुरू असताना, कोहली, कोहली… अशा घोषणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की लखनऊचा गोलंदाज नवीन उल हक गोलंदाजी करायला येताच स्टँडमध्ये बसलेले प्रेक्षक विराट कोहलीच्या नावाचा घोषणा देऊ लागले. व्हिडीओमध्ये या घोषणा स्पष्टपणे ऐकू येत आहेत.

हेही वाचा – CSK vs DC: शिवम दुबेने मोडला एमएस धोनीचा विक्रम; चेन्नई सुपर किंग्जसाठी केला ‘हा’ खास कारनामा

स्टँडमध्ये बसलेल्या प्रेक्षकांनी विराट कोहलीचा नावाच्या घोषणा देत नवीन उल हकला डिवचले. यानंतर नवीन उल हकनेही या प्रेक्षकांना आपल्या शैलीत उत्तर दिले. त्याने त्यांच्याकडून पाहून तोंडावर बोट ठेवले, जणू तो प्रेक्षकांना तोंड बंद ठेवण्याचा इशारा देताना दिसत आहे. त्याचा हा फोटो देखील जोरदार व्हायरल होत आहे.

लखनऊचा अवघ्या एका धावेनी शानदार विजय –

केकेआर आणि एलएसजी यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात लखनऊने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ विकेट गमावत १७६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात केकेआरच्या संघाने २० षटकात ७ बाद १७५ धावा केल्या. लखनऊचा निम्मा संघ ७३ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. यानंतर सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना निकोलस पूरनने शानदार अर्धशतकी खेळी खेळून संघाला या धावसंख्येपर्यंत नेले. पुरणने ३० चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ५८ धावा केल्या. त्याचबरोबर लखनऊ प्लेऑपमध्ये पोहोचणारा तिसरा संघ ठरला आहे. कारण त्याचे १७ गुण झाले आहेत.