Ryan Rickelton wicket No ball MI vs SRH IPL 2025: आज आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करत १६३ धावांचे मुंबईला विजयासाठी आव्हान दिले आहे. मुंबईकडून रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनची जोडी मैदानात उतरली होती. रोहित २६ धावा करत बाद झाला. मात्र रिकल्टनच्या विकेटवर मोठा गदारोळ पाहायला मिळाला.
रायन रिकल्टन २१ धावा करत खेळत होता. तितक्यात पॉवरप्लेनंतर झीशान अन्सारी गोलंदाजीला आला. त्याने चौथ्या चेंडूवर रिकल्टनला झेलबाद केलं. झीशानने आपल्या गोलंदाजीने रिकल्टनला त्रास दिला होता, तो लवकरच बाद होईल अशी चित्र होती आणि तो झेलबाद झाला. पण चौथ्या पंचांनी मोठा ट्विस्ट आणला. रिकल्टन बाद होऊन मैदानाबाहेर गेला आणि तितक्यात त्याला मैदानावर बोलवण्यात आलं.
पंचांचा निर्णय पाहून सर्वच जणांना धक्का बसला. पॅट कमिन्सने कव्हरवर फिल्डिंग करताना एक कमालीचा झेल टिपला. पण पंचांनी नो बॉल म्हणत रिकल्टनला मैदानावर बोलावलं होतं. पण झीशानने ना लाईन क्रॉस केली होती, ना बॅकफूट नो बॉल होता. गोलंदाजीच्या टोकावरून नाही तर फलंदाजीच्या टोकावरून ही चूक झाली होती.
हेनरिक क्लासेन विकेटकिपिंग करताना विकेट्सच्या जवळ किपिंग करत होता. किपिंग करता करता क्लासेनचे ग्लोव्हज विकेटच्या पुढे आले आणि हाच नो बॉल ठरला.
काय आहे नो बॉलचा नियम?
नियम २७.३.१ नुसार, जर यष्टीरक्षकाने चेंडू स्टंपसमोर किंवा स्टंपच्या रेषेत फलंदाजाने खेळण्यापूर्वी किंवा फलंदाजाच्या शरीराला स्पर्श करण्यापूर्वी जर ग्लोव्हज विकेटच्या पुढे आणले तर पंच नो बॉल सिग्नल करू शकतो. क्लासेनच्या दिशेने चेंडू न आल्याने त्याला पुढे येऊन चेंडू टिपण्याची गरज नव्हती. पण तरीही त्याचे ग्लोव्हज स्टंपच्या रेषेत होते.