scorecardresearch

…अन् त्याने मला १५ व्या मजल्याच्या बाल्कनीत लटकत ठेवलं; चहलने सांगितला ‘तो’ भयानक किस्सा!

रविचंद्रन अश्विन, यजुवेंद्र चहल आणि करुण नायर एका व्हिडीओत आपल्या आयुष्यातील काही प्रसंगांविषयी बोलताना दिसत आहेत. यातच चहलने आपल्यावर बेतलेला आणि थोडक्यात बचावल्याची ही घटना सांगितली.

खूप कमी लोकांना माहिती असेल की लेग स्पिनर यजुवेंद्र चहल आयपीएलच्या (IPL) सुरुवातीच्या काळात मुंबई इंडियन्स संघात होता. २०१४ मध्ये यजुवेंद्र चहल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघाचा भाग झाला. आता चहल राजस्थान रॉयल्सचा (RR) भाग आहे. राजस्थानने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला. यात रविचंद्रन अश्विन, यजुवेंद्र चहल आणि करुण नायर आपल्या आयुष्यातील काही प्रसंगांविषयी बोलताना दिसत आहेत. यातच चहलने आपल्यावर बेतलेला आणि थोडक्यात बचावल्याची ही घटना सांगितली.

यजुवेंद्र चहल म्हणाला, “माझ्या सोबत घडलेल्या या घटनेविषयी खूप कमी लोकांना माहिती आहे. मी याबाबत कधीही कोणाला सांगितलं नाही. ही गोष्ट मी मुंबई इंडियन्स संघात होतो तेव्हाची म्हणजे २०१३ ची आहे. आमचा बंगलोरमध्ये एक सामना होता. त्यानंतर गेट टुगेदर होतं. तेव्हा एक खेळाडू खूप नशेत होता. मी त्यांचं नाव सांगणार नाही. तो बराच वेळेपासून मला पाहत होते. त्याने मला बोलावलं आणि बाल्कनीत लटकवलं.”

हेही वाचा : “लोक तुला मारून टाकतील, मुंबईत येऊन सचिनला बाद करायला तुला…”, शोएब अख्तरने सांगितला आयपीएलचा ‘तो’ किस्सा

“मी माझ्या हाताने त्या खेळाडूच्या माने मागे हात टाकून डोकं पकडलं. माझा हात सुटला असता तर… तेव्हा मी १५ व्या मजल्यावर होतो. अचानक तेथे अनेक लोक आले आणि त्यांनी परिस्थिती सांभाळली. मी बेशुद्धावस्थेत गेल्याप्रमाणे होतो. त्यांनी मला पाणी पाजलं. मला तेव्हा लक्षात आलं की आपण कोठेही गेलो तर आपण किती जबाबदारीने वागलं पाहिजे. ही अशी घटना होती ज्यात मी अगदी थोडक्यात बचावलो होतो. थोडी चूक झाली असती तरी मी १५ व्या मजल्यावरून खाली पडलो असतो,” असंही यजुवेंद्र चहलने नमूद केलं.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Yuzvendra chahal tell how a drunk teammate hang him in balcony of 15th floor during ipl 2013 pbs

ताज्या बातम्या