Yuzvendra Chahal chance to create history in IPL: आयपीएल २०२३ मधील ५६ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात आज होणार आहे. सामना दोन्ही संघांच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी महत्त्वाचा आहे. ११-११ सामन्यांत दोन्ही संघांचे १०-१० गुण आहेत. हा सामना गमावल्यानंतर, पुढील दोन सामने जिंकूनही दोन्ही संघ १४ गुणांपर्यंत पोहोचतील, जे प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी पुरेसे नसतील. या सामन्यात राजस्थानचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची संधी असेल. एक विकेट घेताच तो आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनेल.
युजवेंद्र चहलने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात ४ बळी घेत ड्वेन ब्राव्होची बरोबरी केली. युजवेंद्र चहल आणि ड्वेन ब्राव्होच्या नावावर १८३ विकेट्सची नोंद आहे. कोलकाताविरुद्धच्या सामन्यात युजवेंद्र एक विकेट घेताच इतिहास रचणार आहे. या सामन्यात राजस्थान संघ तीन फिरकीपटूंना उतरवणार हे निश्चित आहे. चहलशिवाय रविचंद्रन अश्विन आणि अॅडम झाम्पा यांनी शानदार गोलंदाजी केली आहे. चहल १७ बळींसह फ्रँचायझीकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. अश्विनने १४ विकेट घेतल्या आहेत. अॅडम झाम्पाने ४ सामन्यात ५ विकेट घेतल्या आहेत.
आंद्रे रसेलविरुद्ध संजू ही रणनीती अवलंबणार –
संजू सॅमसनला या तीन फिरकीपटूंचा चतुराईने वापर करावा लागणार आहे. या मोसमात आंद्रे रसेलविरुद्ध लेगस्पिनर खूप प्रभावी ठरले आहेत. लेगस्पिनरने त्याला ८ वेळा बाद केले आहे. याचा अर्थ संजू नक्कीच चहल आणि झाम्पाचा वापर या केकेआरच्या दिग्गजाविरुद्ध करेल. रसेलने पंजाब किंग्जविरुद्ध (पीबीकेएस) उत्कृष्ट खेळी खेळली. त्याने २३ चेंडूत ४२ धावा ठोकल्या होत्या.
जेसन रॉयला बोल्टपासून धोका –
ट्रेंट बोल्ट गेल्या सामन्यात खेळला नव्हता. किवी गोलंदाजाकडे पहिल्याच षटकात विकेट घेण्याची क्षमता आहे. तो खेळला तर कोलकाताविरुद्धही असेच होऊ शकते. त्याचा जेसन रॉयविरुद्धचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्याने या इंग्लंडच्या फलंदाजाला टी-२० मध्ये 25 चेंडूत ३४ धावा देऊन दोनदा बाद केले आहे.
हेही वाचा – VIDEO: ‘या’ खेळाडूला पाहून माहीभाईची प्रतिमा आठवते; फिरकीपटू युजवेंद्र चहलचे वक्तव्य
केकेआर विरुद्ध आरआर हेड टू हेड रेकॉर्ड –
कोलकाता आणि राजस्थान आतापर्यंत २६ वेळा आमनेसामने आले आहेत. कोलकाताने १४ आणि राजस्थानने १० सामने जिंकले आहेत. कोलकाता आणि राजस्थान यांच्यातील शेवटचा सामना २०२२ साली झाला होता. कोलकाताने ७ विकेट्सने विजय मिळवला. २०२२ मध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात राजस्थानने युजवेंद्र चहलच्या हॅटट्रिकच्या जोरावर ७ धावांनी विजय मिळवला होता.