यंदाच्या वर्षांत ग्रँडस्लॅम जेतेपदाची कमाई करणाऱ्या मारिन चिलीचच्या शानदार प्रदर्शनाच्या जोरावर यूएई रॉयल्सने इंटरनॅशनल टेनिस प्रीमिअर लीग स्पर्धेतल्या दिल्लीत विजयी सलामी दिली. पाचपैकी चार लढती जिंकत रॉयल्सने ही लढत २९-१६ अशी जिंकली. एकेरीच्या पहिल्या लढतीत रॉयल्सच्या चिलीचने स्लॅमर्सच्या ल्युटन हेविटचा ६-३ असा धुव्वा उडवला. बेसलाइनवरून खेळणाऱ्या चिलीचने अचूक सव्‍‌र्हिसच्या बळावर ३-० अशी आघाडी घेतली. पॉवरपॉइंट घेत हेविटने गुणांचे खाते उघडले. चिलीचने हेविटच्या स्वैर खेळाचा फायदा उठवत ५-१ अशी आघाडी वाढवली. हेविटने थरारक खेळ करत ३-५ अशी आगेकूच केली. मात्र चिलीचने निर्णायक क्षणी खेळ उंचावत सेट जिंकला.
पुरुष दुहेरीच्या लढतीत चिलीचने नेनाद झिम्नोझिकच्या साथीने खेळताना स्लॅमर्सच्या ल्युटन हेविट-निक कार्यिगोस जोडीवर ६-२ असा विजय मिळवला. दुहेरीचा विशेषज्ञ खेळाडू असणाऱ्या झिम्नोझिकने चिलीचच्या साथीने खेळताना आक्रमणावर भर देत विजय साकारला.
माजी खेळाडूंच्या लढतीत रॉयल्सच्या गोरान इव्हानिसेव्हिकने स्लॅमर्सच्या पॅट राफ्टरला ६-१ असे नमवले. कारकिर्दीत प्रेक्षकांचा पाठिंबा मिळवत खेळणाऱ्या इव्हानिसेव्हिकने भारतीय चाहत्यांनाही भुरळ घालत दणदणीत विजयासह आपल्या संघाला ही लढत जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
मिश्र दुहेरीच्या लढतीत नेनाद झिम्नोझिक- क्रिस्तिना लाडेनोव्हिक जोडीने डॅनिएला हन्तुचोव्हा-निक कार्यिगोस जोडीचा ६-४ असा पराभव केला. अंतिम लढतीत कॅरोलिन वोझ्नियाकीला पराभव स्वीकारावा लागल्याने यूएई रॉयल्सचे निर्भेळ विजयाचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. डॅनिएला हन्तुचोव्हाने वोझ्नियाकीवर ६-५ अशी मात केली.