Curtis Campher Took 5 Wickets: आयर्लंडचा अष्टपैलू खेळाडू कर्टिस कॅम्फरने गुरुवारी (१० जुलै) झालेल्या सामन्यात इतिहासाला गवसणी घातली आहे. तो व्यावसायिक क्रिकेटमध्ये ५ चेंडूत ५ गडी बाद करणारा जगातील पहिलाच गोलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम कुठल्याही गोलंदाजाला करता आलेला नाही. त्याने हा कारनामा आंतरप्रांतीय टी-२० ट्रॉफीमध्ये करून दाखवला आहे.
क्रिकेटमध्ये हॅट्रीक घेणं ही खूप मोठी गोष्ट असते. पण, एखादा गोलंदाज जर लागोपाठ ५ चेंडूंवर ५ फलंदाजांना बाद करत असेल, तर ही दुर्मिळ गोष्ट आहे. असा कारनामा कर्टिस कॅम्फरने करून दाखवला आहे. आंतरप्रांतीय टी-२० लीग स्पर्धेतील नॉर्थ वेस्ट वॉरियर्स विरूद्ध मुंस्टर रेड्स यांच्यात झालेल्या सामन्यात हा रेकॉर्ड झाला आहे. कर्टिस कॅम्फरने मुंस्टर रेड्सकडून खेळताना २.३ षटकात १६ धावा खर्च केल्या आणि ५ गडी बाद केले. हे ५ गडी त्याने २ षटकात बाद केले आहेत. या दमदार गोलंदाजीच्या बळावर नॉर्थ वेस्ट वॉरियर्स संघाचा डाव अवघ्या ८८ धावांवर आटोपला.
नॉर्थ वेस्ट वॉरियर्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १८९ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना या संघाचा डाव ५ गडी बाद ८७ धावा असताना ८८ धावांवर आटोपला. कर्टिस कॅम्फरने १२ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर जेरेड विल्सनला बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने ग्राहम ह्युमला पायचित करत माघारी धाडलं.
त्यानंतर तो १४ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला. या षटकातील पहिल्या चेंडूवर त्याला हॅट्रीक घेण्याची संधी होती. त्याने पहिल्याच चेंडूवर अँडी मॅकब्राईनला बाद करत माघारी धाडलं. यासह त्याने आपली हॅट्रीक पू्र्ण केली. त्यानंतर दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला रॉबी मिलर झेलबाद होऊन माघारी परतला. ११ व्या क्रमांकावर आलेला जोश विल्सन त्रिफळाचित होऊन माघारी परतला. यासह कर्टिस कॅम्फरने सलग ५ चेंडूंवर ५ फलंदाजांना बाद केलं. असा कारनामा करणारा तो जगातील पहिलाच व्यायसायिक क्रिकेटपटू ठरला आहे.
कर्टिस कॅम्फरने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना देखील ४ चेंडूत ४ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. याआधी झिम्बाब्वेच्या १९ वर्षांखालील महिलांच्या संघातील कॅलिस नधलोवुने २०२४ मध्ये देशांर्गत क्रिकेट खेळताना ५ चेंडूत ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला होता. कर्टिस कॅम्फरच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ६१ सामन्यांमध्ये २१.०० च्या सरासरीने ९२४ धावा केल्या आहेत. यासह गोलंदाजी करताना त्याने ६१ सामन्यांमध्ये ३१ गडी बाद केले आहेत.