अ‍ॅमस्टेलवीन येथील आर्यलड आणि नेदरलँड्स यांच्यात उत्कंठावर्धक रंगलेला सामना बरोबरीत सुटल्यानंतर आर्यलडने सलग तिसऱ्यांदा आयसीसी विश्वचषकासाठी पात्र होण्याचा मान पटकावला.
आर्यलडचे २६९ धावांचे आव्हान पार करताना नेदरलँड्सला अखेरच्या दोन चेंडूंवर ११ धावांची आवश्यकता असताना मायकेल रिपोन याने एक चौकार आणि एक षटकार ठोकत सामना बरोबरीत सोडवला. मात्र आर्यलडने आयसीसी जागतिक क्रिकेट लीग स्पर्धेचे जेतेपद पटकावून २०१५मध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील स्थान निश्चित केले.
त्याआधी, ईडी जॉयस (नाबाद ९६) आणि नियाल ओब्रायन (५०) यांच्या अर्धशतकी खेळीमुळे तसेच पॉल स्टर्लिग (४९) याने दिलेल्या उपयुक्त योगदानामुळे आर्यलडने ५० षटकांत ५ बाद २६८ धाव उभारल्या. हे उद्दिष्ट गाठताना नेदरलँड्सने आश्वासक सुरुवात केली. वेस्ली बारेस्सी (४६), एरिक स्वार्किंस्की (४४) आणि स्टीफन मायबर्ग (३५) यांच्या सुरेख खेळीमुळे नेदरलँड्सने १ बाद १३५ अशी मजल मारली होती. त्यानंतर डॅन व्हॅन बंग (४५) आणि टॉम कूपर (३८) यांनी नेदरलँड्सला विजयासमीप आणून ठेवले.
१२ चेंडूंत १६ धावांची गरज असताना अ‍ॅलेक्स कूसाकने ४९व्या षटकांत अवघ्या तीन धावा दिल्या. अखेरच्या षटकात जॉन मूनीने पहिल्या चार चेंडूंवर दोन धावा दिल्या. मात्र रिपोनने दोन चेंडूंत १० धावा वसूल करत सामना बरोबरीस सोडवला. आर्यलडने १२ सामन्यांत नऊ विजयांसह २० गुणांची कमाई करत विश्वचषकासाठी पात्र होण्याची किमया केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयसीसीकडून आर्यलडचे कौतुक
दुबई :आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीशी (आयसीसी) संलग्न असलेल्या संघांपैकी २०१५ विश्वचषकात स्थान मिळवलेला आर्यलड हा पहिला संघ ठरल्यामुळे आयसीसीने आर्यलडच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. ‘‘आर्यलडने सुरेख खेळ केला. २००७ आणि २०११च्या विश्वचषकामधील कामगिरीची ते पुनरावृत्ती करतील, अशी आशा आहे,’’ असे आयसीसीने पत्रकात म्हटले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ireland eligible for the 2015 world cup
First published on: 11-07-2013 at 01:42 IST