Irfan Pathan advised the Indian team : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघ रणनीतीनुसार गोलंदाजी करू शकला नाही, असे मत भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण यांनी व्यक्त केले. सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारताला एक डाव आणि ३२ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना इरफान पठाण म्हणाला की, भारतीय संघाला कधी आक्रमण करायचे आणि केव्हा बचाव करायचा हे समजू शकले नाही. त्यामुळे भारताचा पराभव झाला.

डीन एल्गरचे कच्चे दुवे –

सुपरस्पोर्ट पार्क येथे झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज डीन एल्गरने १८५ धावांची शानदार खेळी साकारली. एल्गरसमोर भारतीय गोलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. भारतीय संघ डीनचे कच्चे दुवे पकडण्यात अपयशी ठरल्याचे इरफानचे मत आहे.
इरफान पठाण म्हणाला, “डीन एल्गरचे कच्चे दुवे म्हणजे तो आखूड टप्याच्या चेंडूचा सामना करताना अडखळतो. जेव्हा तो ६०-७० धावांवर फलंदाजी करत होता, तेव्हा तुम्ही त्याला आखूड टप्याच्या चेंडू टाकले होते. आता पुढील सामन्यात त्याला आखूड टप्याचे चेंडू लवकर टाका. तो ऑस्ट्रेलियात ४ वेळा आखूड टप्याच्या चेंडूवर बाद झाला आहे. मी याबद्दल कॉमेंट्रीमध्येही बोललो आहे. मालिकेत बरोबरी साधण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या सामन्यात चांगली गोलंदाजी करावी लागेल.”

भारतीय गोलंदाजी शिस्तबद्ध नव्हती –

इरफान पठाण पुढे म्हणाला, भारताची गोलंदाजी शिस्तबद्ध नव्हती. दुसऱ्या सामन्यात भारताने आपल्या गोलंदाजीत सुधारणा न केल्यास सामना अनिर्णित राहण्याऐवजी संपूर्ण मालिका गमावू शकतो, असे पठाणचे मत आहे. इरफान पुढे म्हणाला की, “भारताची गोलंदाजी शिस्तबद्ध नव्हती. भारतीय गोलंदाजीला आक्रमण विरुद्ध बचावाचा समतोल राखता आला नाही. एल्गर खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतरही भारताने त्यांची आक्रमक गोलंदाजी सुरू ठेवली जणू काही ते त्याला एका चेंडूवर बाद करतील.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – Test Team : क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवडला वर्षातील सर्वोत्कृष्ट कसोटी संघ, विराट-रोहितला नव्हे, तर ‘या’ खेळाडूंना दिले स्थान

डीन एल्गर आपल्या शेवटच्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करताना दिसणार आहे. नियमित कर्णधार टेंबा बावुमा डाव्या पायाला दुखापत झाल्याने दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे ३ जानेवारीपासून सुरू होणारी दुसरी कसोटी जिंकून देत क्रिकेटला अलविदा करण्याचा डीन एल्गरचा प्रयत्न असेल.