समस्त क्रीडाविश्वाचा सर्वोच्च मानबिंदू असलेला फुटबॉल विश्वचषक आता काही महिन्यांवर आला आहे. विश्वचषकाचा झळाळता चषक नावावर करण्यासाठी अव्वल संघांची कसून तयारी सुरू आहे. या मानाच्या जेतेपदाने आतापर्यंत पोर्तुगाल या मातब्बर संघाला हुलकावणी दिली आहे. यंदा मात्र ख्रिस्तियानो रोनाल्डो या किमयागाराला केंद्रस्थानी ठेवून पोर्तुगालने विश्वचषक अभियानासाठी रणनीती आखली आहे. प्रत्येक सामन्यात गोल करण्याच्या अद्भुत क्षमतेच्या जोरावर पोर्तुगालला रोनाल्डोने विजयपथावर न्यावे, अशी कट्टर पोर्तुगालचाहत्यांची इच्छा आहे.
विश्वचषक पटकावण्यासाठी एखाद्या खेळाडूकडून अद्वितीय प्रदर्शन होणे आवश्यक असते. हा खेळाडूच आपल्या शानदार खेळाद्वारे संपूर्ण संघासाठी प्रेरणा ठरतो. २८ वर्षांपूर्वी विश्वचषकासाठी अर्जेटिनाचा संघ मेक्सिकोला रवाना झाला. याच स्पर्धेत मॅराडोना नावाचा चमत्कार फुटबॉलप्रेमींना पाहायला मिळावा. अविस्मरणीय अशा खेळाच्या जोरावर मॅराडोनाने अर्जेटिनाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले. त्यामुळेच आधुनिक काळातील मॅराडोना ही उपाधी मिळालेल्या रोनाल्डोकडून समस्त पोर्तुगालवासीयांच्या प्रचंड अपेक्षा आहेत.
२०१३ वर्षांसाठीचा फिफाचा सर्वोत्तम फुटबॉलपटू पुरस्कार मिळवलेल्या रोनाल्डोने विश्वचषक प्ले-ऑफ लढतीत स्वीडनविरुद्ध चार दमदार गोल करत पोर्तुगालला दिमाखदार विजय मिळवून दिला होता. रोनाल्डोच्या गैरहजेरीत पोर्तुगालची कामगिरी खालावते, हे आकडय़ांवरून स्पष्ट होते. गेली ११ वष्रे संघाचा अविभाज्य घटक असलेला रोनाल्डो पोर्तुगालसाठी ४९ गोलसह सर्वाधिक गोल झळकावणारा खेळाडू आहे. २०१०च्या विश्वचषकात पोर्तुगालचे आव्हान झटपट संपुष्टात आले होते. त्या कटू स्मृतींना मागे टाकत देशवासीयांना अभिमान वाटेल, असे प्रदर्शन करण्यासाठी रोनाल्डोही आतुर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is the cristiano ronaldo factor enough for portugal
First published on: 12-04-2014 at 08:00 IST