लेइपझिग (जर्मनी) : बदली खेळाडू म्हणून मैदानावर उतरलेल्या मातिआ झॅकाग्नीने भरपाई वेळेत ९८व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे गतविजेत्या इटलीने युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत क्रोएशियाला १-१ असे बरोबरीत रोखले. सामना बरोबरीत सोडविल्यामुळे इटलीने बाद फेरीत प्रवेश केला, तर क्रोएशियाचे आव्हान संपुष्टात आले.

वयाच्या ३८व्या वर्षीही कमालीच्या ऊर्जेने खेळणाऱ्या कर्णधार लुका मॉड्रिचने उत्तरार्धात ५५व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे क्रोएशियाने सामन्यात आघाडी घेतली. ९० मिनिटांनंतरच्या भरपाई वेळेपर्यंत क्रोएशियाने ही आघाडी टिकवली होती. मात्र, राखीव फळीतून मैदानावर उतरलेल्या झॅकाग्नीने सामन्याच्या अगदी अखेरच्या मिनिटाला गोलकक्षातून मारलेली तुफान किक क्रोएशियाच्या गोलजाळीत तेवढ्याच वेगाने गेली. गोलरक्षक डॉमिनिक लिवाकोविचने उजवीकडे झेप घेत चेंडू अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या आणि क्रोएशियाच्या पदरी निराशा पडली.

हेही वाचा >>> अफगाणिस्तानची प्रगती ‘याचि देही याचि डोळा’ पाहणारा मोहम्मद नबी, जागतिक क्रिकेटमध्ये अनोखा विक्रम केला नावे

स्पेन गटात अव्वल

गटातील दुसऱ्या सामन्यात स्पेनने अल्बेनियाचा १-० असा पराभव केला. त्यामुळे सर्व साखळी सामने जिंकताना स्पेनने गटात अव्वल स्थान मिळवले. अल्बेनियाला केवळ एकच गुण मिळवता आला. या पराभवामुळे आता अल्बेनियाच्या सर्वोत्तम तिसरा संघ म्हणून बाद फेरी गाठण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत.

ऑस्ट्रियाचा नेदरलँड्सवर सनसनाटी विजय

युरो स्पर्धेत ड-गटातील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रियाने सनसनाटी निकालाची नोंद करत तगड्या नेदरलँड्सला ३-२ असा पराभवाचा धक्का दिला. या विजयासह ऑस्ट्रियाने गटात अव्वल स्थानासह बाद फेरी गाठली.नेदरलँड्स तिसऱ्या स्थानवर राहिले. अन्य सामन्यात पोलंडने फ्रान्सला १-१ बरोबरीत रोखले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोपा अमेरिका : ब्राझीलला अपयश

लॉस एंजलिस : वर्चस्वपूर्ण आणि आक्रमक खेळ करूनही गोल करण्यात आलेल्या अपयशामुळे ब्राझीलला कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत कोस्टा रिकाविरुद्ध गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले. दुसरीकडे कोलंबियाने पॅराग्वेला २-१ असे नमवत विजयी सलामी दिली.