आयसीसी टी-२० विश्वचषक पुढील वर्षी म्हणजेच २०२६ मध्ये होणार आहे. आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ साठी युरोप विश्वचषक पात्रता सामना खेळवले जात आहेत. स्पर्धेतील सातव्या सामन्यात इटलीने स्कॉटलंडचा १२ धावांनी पराभव करत मोठा दणका दिला आहे. इटलीने या स्पर्धेत आतापर्यंत तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. इटलीचा संघ ५ गुणांसह गुणातालिकेत अव्वल स्थानावर आहे. हा संघ पहिल्यांदाच क्रिकेट विश्वचषकासाठी पात्रतेच्या अगदी जवळ पोहोचला आहे.
इटलीने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ गडी गमावून १६७ धावा केल्या. जस्टिन मोस्का ११ धावा काढून लवकर बाद झाला. एवढंच नाही तर कर्णधार जो बर्न्सही ८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. सुरुवातीला दोन विकेट गमावल्यानंतर, एमिलियो गे ने आक्रमक फलंदाजी केली आणि २१ चेंडूत ५० धावा केल्या. त्याने त्याच्या खेळीदरम्यान ६ चौकार आणि २ षटकार मारले.
त्याच वेळी, हॅरी मॅनेन्टीने ३८ धावांचे योगदान दिले. शेवटी, ग्रँट स्टीवर्टने ४४ धावांची नाबाद खेळी केली. त्याने त्याच्या खेळीदरम्यान २ चौकार आणि ३ षटकार लगावले. स्कॉटलंडकडून मायकेल लीस्कने ३ षटकांत १८ धावा देत ३ विकेट घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटलंडला ५ विकेट गमावून २० षटकांत फक्त १५५ धावा करता आल्या. संघाकडून सलामीवीर जॉर्ज मुन्से यांनी ६१ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ७२ धावा केल्या. पण त्याची खेळी संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. एवढंच नाही तर कर्णधार रिची बॅरिंग्टनने ४६ धावांची नाबाद खेळी केली. तिसऱ्या विकेटसाठी या दोघांनी १०५ धावांची भागीदारी रचली.
स्कॉटलंडच्या संघाला इतर खेळाडूंकडून पाठिंबा मिळाला नाही. इटलीच्या संघाकडून हॅरी मॅनेट्टीने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. या सामन्यात त्याने ४ षटकांत ३१ धावा दिल्या आणि ५ विकेट्स घेतल्या. हॅरीने पहिल्यांदाच ५ विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. इटलीने पहिला सामना सात विकेट्सने जिंकला होता. दुसरा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. इटली आपला शेवटचा सामना ११ जुलै रोजी खेळणार आहे. जर संघ हा पुढील सामना जिंकला तर तो पहिल्यांदाच विश्वचषकासाठी पात्र ठरेल.
भावाला श्रद्धांजली म्हणून इटली संघाकडून खेळतोय खेळाडू
इटली संघाचा कर्णधार जो बर्न्स आहे. जो ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू आहे. बर्न्स हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय संघाकडून खेळला असून तो सलामीवीर फलंदाज आहे. जो बर्न्स आणि डेव्हिड वॉर्नर हे ऑस्ट्रेलियाकडून सलामीसाठी उतरले आहेत. जो बर्न्स हा ऑस्ट्रेलिया संघ, बिग बॅश लीग आणि ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळला आहे. मे २०२४ मध्ये त्याने त्याच्या दिवंगत भावाला आदरांजली म्हणून इटलीकडून खेळण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारी २०२४ मध्ये त्याच्या भावाचा मृत्यू झाला.