कर्शी (उझबेकिस्तान) येथे सुरू असलेल्या आयटीएफ टेनिस स्पर्धेत भारताच्या अंकिता रैनाने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. अंकिताने सर्बियाच्या तिओडोरा मिर्कीकवर १-६, ६-१, ६-३ अशी मात केली. पात्रता फेरीचा अडथळा ओलांडत मुख्य फेरीत दाखल झालेल्या २० वर्षीय अंकितासाठी उपांत्यपूर्व फेरीत खेळण्याची पहिलीच वेळ असणार आहे. अंकिताचा मुकाबला तृतीय मानांकित उझबेकिस्तानच्या निजिना अब्दुराखिमोव्हाशी होणार आहे. क्रमवारीत दोनशेपेक्षा अधिक स्थानांनी पुढे असणाऱ्या मिर्किकविरुद्ध खेळताना अंकिताने पहिला सेट गमावला. मात्र पुढच्या दोन्ही सेट्समध्ये रॅलींच्या वेगावर नियंत्रण मिळवत अंकिताने पुनरागमन केले. जमिनीलगतच्या ताकदवान फटक्यांच्या जोरावर अंकिताने दुसरा सेट नावावर केला आणि सामन्यातील आव्हान जिवंत राखले. तिसऱ्या आणि निर्णायक मुकाबल्यात पहिल्या पाच गेम्समध्ये अंकिताने दोनदा सव्‍‌र्हिस गमावली. मात्र चार आंतरराष्ट्रीय स्पर्धाच्या अंतिम फेरीत खेळण्याचा अनुभव असलेल्या अंकिताने संयमी खेळ करत सातव्या आणि नवव्या गेममध्ये मिर्किकची सव्‍‌र्हिस भेदत विजयावर शिक्कामोर्तब केले.
‘‘या स्पर्धेसाठी येण्याआधी माझी मन:स्थिती ठीक नव्हती. काही दिवसांपूवीच माझ्या आजोबांचे निधन झाले. मात्र भक्कम पाठिंबा देणाऱ्या आजोबांसाठी काही सामने तरी जिंकायचेच असा निर्धार मी केला होता,’’ असे अंकिताने सांगितले.