पाऊस आणि निसरडा मार्ग या अडथळ्यांतून मार्ग काढत मर्सिडिझच्या लुइस हॅमिल्टनने जपान ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीचे जेतेपद पटकावले. ज्युलेस बियांची अपघातात बेशुद्ध पडल्याने लाल झेंडा दाखवत शर्यत अर्धवट संपवण्यात आली आणि हॅमिल्टनला विजयी घोषित करण्यात आले. चुरशीच्या लढतीत आपला सहकारी निको रोसबर्गला टक्कर देत हॅमिल्टनने जेतेपद पटकावले खरे, पण बियांचीला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात न्यावे लागल्यामुळे हॅमिल्टनचे हे जेतेपद काहीसे झाकोळले गेले.
हॅमिल्टनने २९व्या लॅपदरम्यान मागे टाकले, त्यानंतर सुरेख कामगिरीचे प्रदर्शन करत हॅमिल्टनने सुझुका ग्रां. प्रि.चे पहिलेवहिले जेतेपद मिळवले. या जेतेपदासह हॅमिल्टनने (२६६ गुण) ड्रायव्हर्स अजिंक्यपद शर्यतीत रोसबर्गला (२५६ गुण) मागे टाकून १० गुणांच्या फरकाने अव्वल स्थान प्राप्त केले आहे. आता या मोसमातील चार शर्यती शिल्लक राहिल्या असून विश्वविजेतेपदावर नाव कोरण्यासाठी हॅमिल्टम उत्सुक आहे.
मुसळधार पावसामुळे सर्वच ड्रायव्हर्सना धोक्याचा इशारा देण्यात आला होता. विजेच्या कडकडाटांसह पावसाचा जोर वाढल्याने आणि बियांचीच्या कारला अपघात झाल्यामुळे शर्यत दोन फेऱ्यांआधीच संपवण्यात आली. रोसबर्गने दुसरे स्थान पटकावले. रेड बुलचे ड्रायव्हर सेबॅस्टियन वेटेल आणि डॅनियल रिकार्डियो अनुक्रमे तिसरे आणि चौथे आले. मॅकलॅरेनच्या जेन्सन बटनने पाचव्या स्थानावर मजल मारली. विल्यम्सचे वाल्टेरी बोट्टास आणि फेलिपे मासा यांनी अनुक्रमे सहावे आणि सातवे स्थान प्राप्त केले. सहारा फोर्स इंडियाच्या निको हल्केनबर्गने आठव्या तर सर्जिओ पेरेझने दहाव्या स्थानी झेप घेतली.
अपघातानंतर ज्युलेस बियांची बेशुद्धावस्थेत
जपान ग्रां. प्रि. शर्यतीदरम्यान झालेल्या गंभीर अपघातानंतर मॉरुसिया संघाच्या ज्युलेस बियांचीला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. बियांचीची गाडी संयोजकांच्या गाडीला धडकल्याने हा अपघात झाला. पावसाळी वातावरणामुळे हेलिकॉप्टरऐवजी रुग्णवाहिकेद्वारेच बियांचीला बेशुद्धावस्थेतच रुग्णालयात नेण्यात आले. ‘‘बियांची आता बेशुद्धावस्थेत नाही, मात्र यापेक्षा जास्त आम्ही काही सांगू शकत नाही,’’ असे मॉरुसिया संघव्यवस्थापनाने स्पष्ट केले. दरम्यान, एड्रियन सुटिलची गाडी संरक्षक भिंतीला जाऊन धडकली. चक्रीवादळाच्या इशाऱ्याच्या पाश्र्वभूमीवर सुरू झालेल्या या शर्यतीत बहुतांशी ड्रायव्हर्सनी रस्ता नीट दिसत नसल्याची तक्रार केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Japanese gp lewis hamilton sad after anti climatic win
First published on: 06-10-2014 at 01:28 IST