Jasprit Bumrah Joe Root Wicket Video: भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सवर सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने जोरदार सुरुवात केली. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला बाद करत भारताला महत्त्वपूर्ण ब्रेकथ्रू मिळवून दिला. यानंतर पुढच्या षटकात बुमराहने सलग दोन चेंडूंवर दोन विकेट घेत इंग्लंडला मोठे धक्के दिले. बुमराहने दुसऱ्या दिवशी पहिल्या अर्ध्या तासात ३ विकेट्स घेत भारताला मजबूत स्थितीत आणलं.
इंग्लंडने लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी ४ बाद २५१ धावा केल्या होत्या. दिवसाचा खेळ संपल्यावर जो रूट ९९ धावांवर, तर बेन स्टोक्स ३९ धावांवर नाबाद होता. पहिल्या दिवशी जसप्रीत बुमराहने हॅरी ब्रूकला क्लीन बोल्ड करून आपल्या नावावर सामन्यातील पहिली विकेट घेतली होती. दुसऱ्या दिवशी त्याने प्रभावी आणि भेदक गोलंदाजी करत आणखी ३ महत्त्वाच्या विकेट्स मिळवल्या.
दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर जो रूटने सुंदर चौकार मारत आपल्या कसोटी कारकिर्दीतील ३७वे शतक साजरं केलं. रूटने संयमी आणि प्रसंगी आक्रमक फलंदाजी करत लॉर्ड्सच्या मैदानावर आपलं आठवं कसोटी शतक पूर्ण केलं.
यानंतर बुमराहने त्याच्या स्पेलमधील दुसऱ्या षटकात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला क्लीन बोल्ड करत भारताला महत्त्वाचा ब्रेकथ्रू मिळवून दिला. स्टोक्सने ४४ धावा केल्या आणि माघारी परतला. स्टोक्सच्या विकेटनंतर बुमराहने आपल्या स्पेलमधील तिसऱ्या षटकात, म्हणजेच सामन्यातील ८८व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर जो रूटला क्लीन बोल्ड केलं. बुमराहचा चेंडू जमिनीवर आदळून आतमध्ये वळला, रूटच्या बॅटची कड घेत थेट मिडल स्टम्पवर आदळला आणि बेल्स हवेत उडाल्या. ही विकेट पाहून रूट निराश झाला आणि खांदे खाली टाकत माघारी परतला.
दरम्यान, बुमराहने रूटला बाद केल्यानंतर थंड शांत सेलिब्रेशन केलं आणि त्याच्याकडे एक जळता कटाक्ष टाकला. बुमराहच्या या भन्नाट विकेटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
जसप्रीत बुमराहने जो रूटला कसोटी क्रिकेटमध्ये ११ वेळा बाद केलं आहे. यामुळे त्याने ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पॅट कमिन्सच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. कमिन्सनेही रूटला कसोटीत ११ वेळा माघारी पाठवलं आहे.
जसप्रीत बुमराहने २ चेंडूत २ विकेट
लॉर्ड्स कसोटीत बुमराहने इंग्लंडच्या डावातील ८८व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जो रूटला क्लीन बोल्ड केलं. त्यानंतर लगेच दुसऱ्या चेंडूवर त्याने नुकताच आलेल्या ख्रिस वोक्सलाही बाद केलं. वोक्सने बुमराहचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटची कड घेऊन थेट यष्टीरक्षक ध्रुव जुरेलच्या हातात गेला. भारताने झेलबादसाठी अपील केलं, पण मैदानी पंचांनी नाबाद असा निर्णय दिला. त्यानंतर भारताने रिव्ह्यू घेतला. अल्ट्राएजमध्ये चेंडू बॅटला स्पर्श करताना स्पष्ट दिसला आणि वोक्सला झेलबाद घोषित करण्यात आलं. यामुळे भारताने सलग दोन चेंडूंवर दोन महत्त्वाच्या विकेट्स मिळवत इंग्लंडला मोठा धक्का दिला.