Jasprit Bumrah Might Retire From Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराह फारसा प्रभावी दिसला नाही. चौथ्या कसोटी सामन्यात तर बुमराहला लय मिळवण्यासाठी फार मेहनत करावी लागली. बुमराहचा वेगही खूपच कमी दिसत होता आणि या कसोटी सामन्यात त्याने आतापर्यंत टाकलेल्या १७३ चेंडूंपैकी त्याने फक्त एकच चेंडू १४० पेक्षा जास्त वेगाने टाकला आहे. यासह बुमराह सामन्यादरम्यान फिटही दिसत नव्हता. तो काही वेळासाठी मैदानाबाहेरदेखील होता. या सर्व चर्चांदरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटूने बुमराह कसोटीतून निवृत्ती घेईल असं मोठं वक्तव्य केलं आहे.
लॉर्ड्स कसोटी सामन्यात ७ बळी घेणारा भारतीय संघाचा हा वेगवान गोलंदाज मँचेस्टर कसोटी सामन्यात पूर्णपणे फॉर्मात नव्हता. या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहला आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध फक्त एकच बळी घेता आला आहे. तो संपूर्ण सामन्यात लय मिळवण्यासाठी संघर्ष करत असल्याचे दिसून आले. आता माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने त्याच्याबद्दल धक्कादायक दावा केला आहे.
जसप्रीत बुमराहच्या कमी होणाऱ्या वेगाबद्दल, मोहम्मद कैफने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटलं, “माझ्या मते, जसप्रीत बुमराह आगामी कसोटी सामन्यांमध्ये खेळताना दिसणार नाही. तो कदाचित निवृत्तही होऊ शकतो. तो आपल्या शरीराशी झुंजतो आहे आणि यामुळे त्याला कसोटी क्रिकेट सोडावं लागण्याची शक्यता आहे. या सामन्यात त्याचा वेगही दिसून आला नाही.”
पुढे कैफ म्हणाला, “बुमराह स्वाभिमानी खेळाडू आहे. जर त्याला वाटलं की तो १०० टक्के आपल्या देशासाठी कामगिरी करत नाहीये किंवा सामने जिंकून देत नाहीये, विकेट घेऊ शकत नाहीये तर तो स्वत:हून तो माघार घेईल असं मला वाटतंय.”
“माझ्या मते, त्याला विकेट मिळणं, न मिळणं ही दुसरी बाब आहे. पण तो १२५-१३० च्या वेगाने गोलंदाजी करत होता. ज्या चेंडूवर त्याला विकेट मिळाली, तो पकडण्यासाठी कीपरला पुढे येऊन झेल घ्यावा लागला. फिट असलेल्या बुमराहचा चेंडू खूप वेगाने बाहेर येतो,” असं पुढे कैफ म्हणाले.
जसप्रीत बुमराह इंग्लंड दौऱ्यातील तिसरा कसोटी सामना खेळत आहे. टीम इंडियाच्या व्यवस्थापनाने वर्कलोड लक्षात घेऊन बुमराहला दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर ठेवले होते. पण तिसऱ्या कसोटी सामन्यातच बुमराह खूप थकलेला दिसत होता आणि त्याचा वेगही मंदावला होता. चौथ्या कसोटी सामन्यात बुमराहने २८ षटकांचा स्पेल गोलंदाजी केली आणि ९५ धावा देऊन फक्त एकच बळी घेतला.