Jasprit Bumrah Celebration in Asia Cup Final 2025: भारतीय संघाने आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान संघाला सर्वबाद केलं आहे. यादरम्यान जसप्रीत बुमराहने हारिस रौफल क्लीन बोल्ड करत असं काही कमाल सेलिब्रेशन केलंय की सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पाकिस्तानचा संघ १९.१ षटकांत १४६ धावा करत सर्वबाद झाला. जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि वरूण चक्रवर्ती या गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी केली.

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना पॉवरप्लेमध्ये एकही विकेट गमावली नाही. भारताच्या गोलंदाजीविरूद्ध मोठी धावसंख्या उभारली नाही, पण विकेटही गमावली नसल्याने भारतावर दबाव होता. पाकिस्तानने पॉवरप्लेमध्ये ५६ धावा केल्या. यानंतर वरूण चक्रवर्तीने भारताला पहिली विकेट मिळवून दिली. बुमराह सुरूवातीच्या षटकांमध्ये महागडा ठरल. पण यानंतर दोन षटकांत त्याने दोन विकेट घेतल्या.

भारत-पाकिस्तान या हाय-व्होल्टेज सामन्यात, भारतीय स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हरिस रौफची विकेट घेतल्यानंतर एक अनोखा ‘प्लेन क्रॅश’ सेलिब्रेशन केलं, ज्याने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.

जसप्रीत बुमराहने रौफला बोल्ड करत केलं प्लेन क्रॅश सेलिब्रेशन

पाकिस्तानच्या फलंदाजीच्या डावात बुमराहने एका कमालीच्या चेंडूने हरिस रौफला बाद केलं. ही घटना १८ व्या षटकात घडली. विकेट घेतल्यानंतर, बुमराहने प्लेन क्रॅश केल्याचं सेलिब्रेशन केलं आणि मग एक कमालीचा कटाक्ष हारिसकडे टाकला. हारिस रौफने गेल्या सामन्यात प्लेन क्रॅश करत भारताला डिवचलं होतं. बुमराहने मात्र त्याला क्लीन बोल्ड करत भर मैदानात भन्नाट सेलिब्रेशन करत त्याला उत्तर दिलं.

हारिस रौफला क्लीन बोल्ड केल्यावर बुमराहने केलेलं सेलिब्रेशन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बुमराहचं हे सेलिब्रेशन भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मैदानावर होत असलेल्या वादांचा भाग ठरलं आहे. बुमराहने या सामन्यात एकूण ३.१ षटकं टाकली आणि २५ धावा देत २ बळी घेतले. रौफ व्यतिरिक्त, बुमराहने मोहम्मद नवाजलाही बाद केलं.

पाकिस्तानने सामन्याची सुरुवात चांगली केली. सलामी जोडीने ८४ धावा जोडल्या. पण, त्यानंतर त्यांचा डाव डळमळीत झाला आणि त्यांना १९.१ षटकांत १४६ धावांवर भारताने सर्वबाद केलं. भारताकडून कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी केली, त्याने ४ षटकांत ३० धावा देत ४ बळी घेतले. वरुण चक्रवर्तीनेही दोन बळी घेतले. अक्षर पटेलनेही दोन बळी घेतले.