Jemimah Rodrigues Biography, Education, Career, Net Worth, Family, Records & Achievements 2025: क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाणाऱ्या मुंबईने भारतीय क्रिकेटला अनेक स्टार क्रिकेटपटू दिले. त्यापैकीच एक खेळाडू म्हणजे जेमिमा रॉड्रिग्ज. वयाच्या चौथ्या वर्षी क्रिकेटची बॅट हातात घेतली. मुंबईतील मैदानांवर मुलांसोबत क्रिकेट खेळून मोठी झाली. यादरम्यान हॉकी या खेळातही नाव कमावलं. आता वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. दरम्यान कसा होता जेमिमा रॉड्रिग्जचा प्रवास? जाणून घ्या.
जेमिमाचा जन्म ५ सप्टेंबर २००० साली मुंबईत झाला. सध्या ती २५ वर्षांची आहे. ज्यावेळी तिने आपल्या क्रिकेटचा प्रवास सुरू केला, त्यावेळी ती अवघ्या ४ वर्षांची होती. क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यात, वडील हे जेमिमाचे पहिले गुरू होते. इवान रॉड्रिग्ज यांच्या मार्गदर्शनाखाली तिने क्रिकेट खेळायला सुरूवात केली.
मुंबईतील आझाद मैदान, ओव्हल मैदान आणि क्रॉस मैदानावर खेळून ती क्रिकेटची बाराखडी शिकली. वडील टेनिस बॉलचा मारा करायचे आणि जेमिमा तासनतास फलंदाजी करायची. तिचे भाऊ सराव करण्यासाठी मैदानावर जायचे. त्यांना खेळताना पाहून जेमिमा देखील क्रिकेटकडे आकर्षित झाली. इथूनच तिच्या क्रिकेट प्रवासाला सुरुवात झाली.
जेमिमाला वयाच्या १२ व्या वर्षी मुंबईच्या १९ वर्षांखालील संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. इथून तिच्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली. तिला मुंबईच्या १९ वर्षांखालील, २३ वर्षांखालील आणि वरिष्ठ महिला संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. यासह तिला वरिष्ठ महिला संघाचं नेतृत्व करण्याची संधी देखील मिळाली. २०२४ मध्ये झालेल्या वरिष्ठ महिला टी -२० ट्रॉफी स्पर्धेत जेमिमाच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबईने अंतिम सामन्यात उत्तराखंड संघाला पराभूत करून जेतेपदाचा मान पटकावला होता.
आंतरराष्ट्रीय कारकीर्द
कमी वयात देशांतर्गत क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर १३ फेब्रुवारी २०१८ ला तिला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यानंतर एका महिन्यानंतर १२ मार्च २०१८ ला तिला भारतीय वनडे संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी तिला ५ वर्षे वाट पाहावी लागली. १४ डिसेंबर २०२३ मध्ये तिला इंग्लंडविरुद्ध खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.
फक्त क्रिकेट नव्हे, हॉकी आणि डान्समध्येही अव्वल
जेमिमा रॉड्रिग्ज केवळ क्रिकेटमध्ये नव्हे तर डान्स आणि हॉकी खेळातही अव्वल आहे. ती नेहमीच डान्स करताना, गाणं गाताना दिसून येत असते. सोशल मीडियावर तिचे डान्स करतानाचे आणि गिटार वाजवून गाणं गात असतानाचे बरेचशे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. कमी वयात क्रिकेटमध्ये भरपूर यश मिळवणारी जेमिमा रॉड्रिग्ज ही हॉकीपटू देखील आहे. तिने महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. एक वेळ अशी आली होती जेव्हा तिला क्रिकेट की हॉकी? दोघांपैकी एका खेळाची निवड करायची होती. त्यावेळी तिने क्रिकेटची निवड केली होती.
