मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला विश्वचषक उपान्त्य सामन्यामध्ये भारताच्या विजयात मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जचे नाबाद शतक निर्णायक ठरले. त्यामुळे समाजमाध्यमांवर ‘भारत की बेटी’, ‘भारत की शान’ अशा बिरुदांनी तिचा गौरव झाला. मात्र, याच जेमिमाला वर्षभरापूर्वी तिच्या धर्मामुळे आणि वडिलांवर झालेल्या ‘आरक्षितां’ना ‘धर्मांतरित’ करण्यासाठी कथित प्रवृत्त करण्याच्या आरोपांमुळे द्वेषपूर्ण टोमण्यांना सामोरे जावे लागले होते.

मुंबईतील सर्वांत जुन्या क्लबपैकी एक असलेल्या खार जिमखान्याने गतवर्षी ऑक्टोबरमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर जेमिमाचे मानद सदस्यत्व रद्द केले. तिचे वडील इव्हान यांनी क्लबच्या जागेचा ‘धार्मिक उपक्रमांसाठी’ वापर केला, असा आक्षेप त्यावेळी काही सदस्यांनी घेतला होता. यामुळे जिमखान्याच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा करण्यात आला.

इव्हान ‘धर्मांतराचा’ कार्यक्रम आयोजित करत होते, असे आरोप झाले. ‘‘आम्हाला जेमिमाचा अभिमान आहे. मात्र, तिच्या वडिलांनी क्लबच्या हॉलमध्ये वर्षभराहूनही अधिक कालावधीत जवळपास ३५ धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले. यासाठी जेमिमाच्या नावावर हॉल घेतला जात होता,’’ असे एका तत्कालीन समिती सदस्याने म्हटले होते.

खार जिमखान्याच्या तत्कालीन अध्यक्षांनी सर्व आरोप फेटाळताना, क्लबमधील गटबाजी आणि निवडणुकीचे राजकारण यास कारणीभूत असल्याचे त्यावेळी सांगितले. मात्र, काही कडव्या भाष्यकारांनी जेमिमाच्या वडिलांवर वारंवार आरोप केले. काहींची पातळी तर तिच्यावर सामूहिक बलात्काराच्या धमक्या देण्यापर्यंत ढासळली. अनेकांनी कोणतीही शहानिशा न करता समाजमाध्यमांवर जेमिमा आणि तिच्या कुटुंबीयांची बदनामी सुरू ठेवली.

जेमिमाचे वडील इव्हान रॉड्रिग्ज यांनी त्यावेळी सर्व आरोप फेटाळून लावले होते. त्या प्रकाराचा जेमिनाच्या मन:स्थितीवर परिणाम झाला होता.

जेमिमाने त्यावेळी कोणतेही भाष्य करणे टाळले. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयी खेळी केल्यानंतर भावनांना वाट मोकळी करून देताना तिने प्रभू येशूचे आभार मानले. ‘मी एकट्याने हे करूच शकले नसते,’ असे जेमिमा म्हणाली. तिच्या या वक्तव्यावरही समाज माध्यमांवर काही जणांकडून विखारी टीका झाली. या स्पर्धेत काही सामन्यांमध्ये जेमिमाला वगळण्यात आले, त्यावेळी खूप निराश झाली होती. जवळपास दररोज मी रडत होते, असे तिने सांगितले. उपान्त्य सामन्यात अगदी अखेरच्या क्षणी तिला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याविषयी सांगण्यात आले. त्याने डगमगून न जाता जेमिमाने एक विक्रमी खेळी साकारली आणि भारतास अविस्मरणीय विजय मिळवून दिला.