वयाच्या १८व्या वर्षी भारताच्या राष्ट्रीय संघात पदार्पण करणाऱ्या जेमिमाने आज भारतीय महिला संघाला आपल्या शतकी खेळीच्या बळावर आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नेण्यात मोठी भूमिका बजावली. जेमिमाने जवळपास भारताच्या डावातील सर्व षटकं मैदानावर फलंदाजी केली. मोठे फटके, विकेटदरम्यान धावा करताना जेमिमा पुरती थकली होती, पण ती खेळीदरम्यान सातत्याने स्वत:शी बोलत होती. याचा खुलासा तिने सामन्यानंतर केला.

शफाली वर्मा १० धावा करत दुसऱ्या षटकात बाद झाली आणि जेमिमा फलंदाजीला आली. जेमिमाला या सामन्यात फलंदाजीची बढती मिळाली आणि ती तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरली. सामन्याच्या अवघ्या काही वेळ आधी जेमिमला ती तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणार याबाबत कळलं. जेमिमा फलंदाजीला आली आणि तिने आपल्या खांद्यावर संघाच्या विजयाची जबाबदारी घेतली.

जेमिमाने सुरूवातीला ५७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं तर ११५ चेंडूत शतक झळकावलं. जेमिमाने शतकानंतर बिलकुल सेलिब्रेशन केलं. भारताला विजय मिळवून देणं हे एकमेव ध्येय तिच्यासमोर होतं. जेमिमा सामन्यादरम्यान सातत्याने स्वत:शी बोलताना दिसत होती.

“मी पूर्णपणे थकली होती आणि…,” जेमिमा सामन्यादरम्यान स्वत:शी नेमकं काय बोलत होती?

जेमिमाला सामन्यानंतर विचारलं की ती मैदानावर स्वत:शी नेमकं काय बोलत होती? तेव्हा ती म्हणाली, “मी फक्त खेळत होते आणि स्वतःशी बोलत होते. सामना जसा शेवटाकडे जात होता मी बायबलमधील एक श्लोक मनात म्हणत होते, कारण मी पूर्णपणे थकली होती, माझ्यात फारशी ताकद नव्हती. तेव्हा मी म्हणत होती, तू फक्त मैदानावर उभी राहा, देव तुझ्यासाठी लढेल आणि खरंच, मी फक्त उभी राहिले व देवाने माझ्यासाठी लढा दिला. मनात भावनांचा उद्रेक सुरू होता, पण मी अखेरच्या चेंडूवर विजय मिळेपर्यंत शांत राहण्याचा प्रयत्न करत होते. भारताने पाच गडी राखून विजय मिळवला हे पाहिलं आणि तेव्हा मी स्वतःला रोखू शकले नाही.”

जेमिमा रॉड्रीग्जने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर सेलिब्रेशन केलं. जेमिमाने सर्वात आधी अमनजोत कौरला मिठी मारत आनंद साजरा केला आणि मैदानावर बसून ती ढसाढसा रडत होती. शून्यावर बाद होत वर्ल्डकप मोहिमेला सुरूवा केलेल्या जेमिमाने आज आपल्या शतकी खेळीच्या जोरावर संघाला विजय मिळवून दिला.