Jemimah Rodrigues Spoke About MS Dhoni: भारतीय क्रिकेटमधल्या सर्वकालिक महान कर्णधारांच्या रांगेतलं सर्वात उठून दिसणारं नाव म्हणजे कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी. धोनीचं क्रिकेटमधलं वर्चस्व आणि त्याच्या स्वभावातील साधेपणा याची नेहमीच चर्चा होते. आता महिला क्रिकेट विश्वचषकात सेमीफायनलमध्ये आपल्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाचा विजय साकार करून देणारी जेमिमा रॉड्रिग्ज हिच्या धोनीशी झालेल्या भेटीची चर्चा होऊ लागली आहे. जेमिमा रॉड्रिग्जनं काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने स्वत:च हा प्रसंग सांगितला होता. त्या मुलाखतीमधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय म्हणतेय जेमिमा रॉड्रिग्ज व्हिडीओमध्ये?

जेमिमानं या व्हिडीओमध्ये कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीशी झालेल्या तिच्या भेटीबाबत सांगितलं आहे. धोनीनं आपल्याला बॅटचं वजन विचारल्याचं ती म्हणाली. “मी धोनीला अनेकदा भेटले आहे. त्यानं एकदा मला विचारलं की ‘तुझ्या बॅटचं वजन किती आहे?’ मी म्हटलं १२०० ग्रॅम. तर तो म्हणाला ‘तू तर माझ्या बॅटपेक्षाही जड बॅट वापरतेस’. तेव्हा आम्ही एका कार्यक्रमात होतो. तिथे पुरुष क्रिकेट संघ आणि महिला क्रिकेट संघ एकत्र होते”, असं जेमिमा यावेळी म्हणाली.

जेमिमानं यावेळी बोलताना धोनीच्या स्वभाववैशिष्ट्याचं कौतुक केलं. “तो खूप विनयशील आहे. त्याचं एक वेगळंच वलय आहे. एकदा न्यूझीलंडमध्ये आम्ही रात्रीचं जेवण करत होतो. युजवेंद्र चहलही आमच्यासोबत होता. आणि धोनी त्या ठिकाणी दाखल झाला. आम्हाला लगेच सगळं वातावरण बदलल्याचं जाणवलं. त्याच्यासोबत त्याचं एक प्रकारचं वलय असतं. पण त्याच्या स्वभावात कमालीचा साधेपणा आहे. तुम्ही त्याच्याशी बोलताना तुम्हाला अजिबात असं वाटत नाही की तुम्ही इतक्या मोठ्या व्यक्तीशी बोलत आहात. तो सगळ्यांशी आपुलकीनं बोलतो”, असं जेमिमा या व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहे.

जेमिमा रॉड्रिग्जच्या शतकामुळे भारताचा विजय साकार

दरम्यान, गुरुवारी झालेल्या महिला विश्वचषक उपांत्य सामन्यात जेमिमा रॉड्रिग्जनं केलेल्या अविस्मरणीय खेळीच्या जोरावर भारतीय संघानं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चीत केलं. ऑस्ट्रेलियानं विजयासाठी दिलेलं ३३९ धावांचं आव्हान भारतानं ५ विकेट्स आणि ९ चेंडू शिल्लक राखून पार केलं. यामध्ये जेमिमा रॉड्रिग्जनं केलेल्या नाबाद १२३ धावांचा समावेश होता.

विशेष म्हणजे समोरच्या बाजूने फलंदाज ठराविक अंतराने बाद होत असताना जेमिमा मात्र संघाला विजय मिळवून देईपर्यंत खेळपट्टीवर ठाण मांडून बसली होती. कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत जेमिमानं केलेल्या १६७ धावांच्या भागीदारीच्या जोरावरच भारतानं ३३९ धावांचं अशक्यप्राय वाटणारं आव्हान पार करून दाखवलं! आता रविवारी २ नोव्हेंबर रोजी अंतिम सामन्यात भारताची गाठ द. आफ्रिकेच्या महिला संघाशी पडणार आहे.