Jemimah Rodrigues Viral Video: नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर गुरुवारी रात्री भारताच्या महिला संघाने विक्रमी कामगिरी करत विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. गेल्या ७ वर्षांपासून अक्षरश: अजेय राहिलेल्या बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला पराभवाची धूळ चारून भारताच्या लेकींनी झोकात अंतिम सामन्याचं तिकीट पक्कं केलं. त्यांच्या या विजयी कामगिरीनंतर देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. खुद्द भारतीय संघातदेखील आनंदाचं वातावरण असून गुरुवारी सामना संपल्यानंतर टीम इंडियानं केलेल्या सेलिब्रेशनमध्ये तेच दिसून आलं. या सामन्यातील भारताच्या विजयाची शिल्पकार ठरलेल्या जेमिमा रॉड्रिग्जनं स्टँड्सकडे पाहून केलेल्या बेभान गिटार सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

जेमिमा रॉड्रिग्जनं साकार केलेला विजय

साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर सेमी फायनलपर्यंत पोहोचण्याचा भारतीय संघाचा प्रवास अतिशय दोलायमान पद्धतीने झाला. पण सेमीफायनलमध्ये पुन्हा ऑस्ट्रेलियाशीच गाठ पडणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर भारताच्या विजयाच्या मनसुब्यांना मोठा धक्का बसला. पण भारतीय महिला खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाचं आव्हान, सेमीफायनल सामन्याचं दडपण आणि कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षा या सगळ्याचं ओझं पेलण्यासाठी आपले खांदे समर्थ आहेत हेच या सामन्यातून दाखवून दिलं.

जेमिमा रॉड्रिग्जचं बहारदार शतक

ऑस्ट्रेलियानं पहिली फलंदाजी करून ३३८ धावांचा डोंगर उभारला. एवढ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग आजतागायत कोणत्याही नॉकआऊट सामन्यात कुठल्याही संघाला करता आलेला नाही. पण टीम इंडियानं अशक्य ते शक्य करून दाखवलं. त्यात जादूच्या कांडीप्रमाणे फिरणारी जेमिमा रॉड्रिग्जची बॅट सामना जिंकेपर्यंत थांबलीच नाही. जवळपास ५० षटकं मैदानावर तळ ठोकून बसलेल्या जेमिमा रॉड्रिग्जनं १२३ धावांची नाबाज बहारदार खेळी साकारली. कर्णधार हरमनप्रीत कौर (८९), दीप्ती शर्मा (२४) आणि ऋचा घोष (२६) यांनी अत्यंत महत्त्वाच्या अशा धावा जोडल्या. अखेर अमनजोत कौरला साथीला घेत जेमिमानं भारताचा विजय निश्चित केला.

BCCI Women च्या एक्स खात्यावर व्हिडीओ पोस्ट!

दरम्यान, सामना संपल्यानंतर बीसीसीआय महिला एक्स हँडलवर भारतीय खेळाडूंच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीमध्ये सामन्यानंतर भावनिक झालेल्या भारतीय खेळाडू, अश्रू अखंडपणे वाहणारी जेमिमा रॉड्रिग्ज, विजयाचं स्वप्न प्रत्येक खेळाडूच्या डोळ्यांत उतरलेलं पाहणारी कर्णधार हरमनप्रीत कौर आणि काही महिन्यांपूर्वी अंतिम सामन्याचं हेच स्वप्न उराशी घेऊन सुरू झालेला प्रवास इथपर्यंत येऊन पोहोचल्याचं समाधानाने पाहणारे प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांचं भावनिक सेलिब्रेशन दिसत आहे. त्यातच जेमिमा रॉड्रिग्जनं केलेलं गिटार सेलिब्रेशन चर्चेत आलं आहे.

विजयानंतर जल्लोष करणाऱ्या प्रेक्षकांना अभिवादन करताना जेमिमा रॉड्रिग्ज मैदानात फिरत होती. त्यावेळी स्टँड्सकडे पाहून जेमिमानं अचानक मध्येच खाली वाकून मैदानाला हात लावला. मग स्टँड्सच्या दिशेनं बोट केलं. ‘माझं तुमच्यासाठी हे सेलिब्रेशन’ असे हावभाव केले आणि एका पायावर बेभानपणे गिटार वाजवत असल्याची कृती केली. या सामन्यातील विजयानंतर एकूणच भारतीय संघाच्या मनातील अत्यानंद आणि जे ठरवलं ते मिळवण्याच्या दिशेनं आणखी एक यशस्वी पाऊल टाकल्याचं समाधान जेमिमाच्या या सेलिब्रेशनमध्ये दिसून येत होतं.