मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी झारखंडची ‘सुवर्णकन्या’ तिरंदाज दीपिका कुमारीला ५० लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्याची घोषणा केली आहे. गेल्या महिन्यात पॅरिसमध्ये झालेल्या तिरंदाजी वर्ल्डकपमध्ये दीपिकाने भारतासाठी तीन सुवर्णपदके जिंकली. दीपिका आणि तिचा पती अतानू दास या जोडीने आधीच ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळविली आहे. या दोघांकडूनही पदकांची अपेक्षा आहे.

मुख्यमंत्र्यांनी शनिवारी झारखंडच्या खेळाडूंशी ऑनलाइन संवाद साधला. त्यांनी आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकविजेत्यांसाठी बक्षीस रकमेची घोषणा केली. २३ जुलैपासून सुरू होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या झारखंडच्या खेळाडूंना मुख्यमंत्र्यांनी २ कोटी रुपये, रौप्य पदक विजेत्यास १ कोटी आणि कांस्यपदक जिंकणाऱ्याला ७५ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.

हेही वाचा – ‘‘भारत-पाकिस्तान सामने व्हावेत ही सौरव गांगुलीची इच्छा”

पॅरिसमधील दीपिकाच्या संघामध्ये सहभागी झालेल्या अंकिता भगत आणि कोमलिका बारी यांनी प्रत्येकी २० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. प्रशिक्षक पुर्णिमा महातो यांना १२ लाख रुपये देण्यात येणार आहेत. ऑलिम्पिकसाठी भारतीय महिला हॉकी संघात निवड झालेल्या निक्की प्रधान आणि सलीमा तेते यांना प्रत्येकी ५ लाख रुपये जाहीर करण्यात आले.

एका दिवसात तीन सुवर्णपदकांची कमाई

पॅरिसमध्ये दीपिका आणि अतानू दास यांनी मिश्र गटात सुवर्णपदक पटकावले. दीपिकाच्या नेतृत्वात भारतीय महिला रिकर्व्ह संघाने सुवर्ण जिंकले. दीपिका व्यतिरिक्त भारतीय संघात अंकिता भगत आणि कोमोलिका बारी यांचा समावेश होता. यानंतर दिवस संपेपर्यंत दीपिकाने वैयक्तिक स्पर्धेतही देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. एका दिवसात तीन सुवर्ण जिंकणारी दीपिका ऑलिम्पिकमध्येही अशीच कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.