Joe Root 39th Century in Test Cricket: इंग्लंडचा सर्वात अनुभवी फलंदाज जो रूटने ओव्हल कसोटीत विक्रमी शतक केलं आहे. जो रूटने १३७ चेंडूत आपली शतकी खेळी पूर्ण केली. भारताने ओव्हल कसोटी विजयासाठी इंग्लंडला ३७४ धावांचं मोठं आव्हान दिलं होतं. प्रत्युत्तरात इंग्लंडची सुरूवात चांगली झाली, पण संघाने ठराविक अंतराने विकेट गमावली. पण नंतर जो रूट आणि हॅरी ब्रूकच्या जोडीने इंग्लंडचा डाव सावरला आणि संघाला मजबूत स्थितीत आणलं. हॅरी ब्रूकनंतर आता जो रूटनेही शतक झळकावत भारताला बॅकफूटवर टाकलं आहे.
जो रूटने कसोटी क्रिकेटमधील त्याचं ३९वं कसोटी शतक झळकावलं आहे. तर भारतीय संघाविरूद्ध हे त्याचं १६वं कसोटी शतक आहे. रूटने गेल्या ५ वर्षांमध्ये शतकांची रांग लावली असून हे त्याचं २२वं शतक आहे. याचबरोबर घरच्या मैदानावर सर्वाधिक २४ शतकं करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.
जो रूटने कोणाला समर्पित केलं कसोटी शतक?
जो रूटने एक धाव घेत आपलं शतक पूर्ण केलं. जो रूटने शतक पूर्ण करताच हेल्मेट काढत बॅट उंचावली. यानंतर त्याने पांढऱ्या रंगाचा हेडबँड लावला आणि जेकब बेथलला मिठी मारली. नॉन स्टाईकर एन्डला परत जाताना त्याने हेडबँडला हात लावत आभाळाकडे बोट दाखवलं आणि डोळे बंद केले. यासह रूटने हे शतक इंग्लंडचा माजी खेळाडू ग्राहम थोर्पला समर्पित केलं. ग्राहम थोर्प हा इंग्लंडकडून खेळताना चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत असत. त्यानंतर आता जो रूट या क्रमांकावर फलंदाजीला उतरतो.
इंग्लंडचा संघ पाचव्या कसोटी सामन्यात पांढऱ्या रंगाचा हेडबँड घालून उतरला होता आणि संघाने हेडबँड लावून फोटोही काढले. या हेडबँडवर GT असं लिहिलेलं आहे, म्हणजेच ग्राहम थोर्प. इंग्लंडचे माजी फलंदाज ग्राहम थॉर्प यांचे ४ ऑगस्ट २०२४ रोजी निधन झाले. १ ऑगस्ट रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी, इंग्लंड संघ मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी पांढरे हेडबँड घालून उतरला आणि दिवंगत खेळाडूला श्रद्धांजली वाहिली.
कोण आहेत ग्राहम थोर्प?
इंग्लंडचे माजी फलंदाज ग्राहम थॉर्प हे त्यांच्या शांत स्वभावासाठी ओळखले जात होते. त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९६९ रोजी सरे येथे झाला. वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. थॉर्प यांनी १९९३ मध्ये इंग्लंडसाठी पदार्पण केले. त्यांनी इंग्लंडसाठी १०० कसोटी सामने खेळले आहेत आणि ४४.६६ च्या सरासरीने ६७४४ धावा केल्या आहेत ज्यामध्ये १६ शतकं आणि ३९ अर्धशतकं आहेत. याशिवाय, त्यांनी ८२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३७.१८ च्या सरासरीने २३८० धावा केल्या आहेत. तो शेवटचा २००५ मध्ये इंग्लंडकडून खेळला होता.