India vs England, Joe Root Record: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना जो रूटने दमदार शतकी खेळी केली आहे. दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारत त्याने आपलं शतक पूर्ण केलं आहे. यासह तो भारतीय संघाविरूद्ध सर्वाधिक शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. यासह त्याने राहुल द्रविडचा रेकॉर्डही मोडून काढला आहे.

या सामन्यातील पहिल्या दिवशी जो रूट ९९ धावांवर नाबाद परतला होता. त्यामुळे त्याला दुसऱ्या दिवशी १ धाव घेताच शतक झळकावण्याची संधी होती. रूटने जराही धीर घेतला नाही. दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराह डावाची सुरूवात करण्यासाठी गोलंदाजीला आला. या षटकातील पहिल्याच चेंडूवर रूटने चौकार मारला आणि आपलं शतक पूर्ण केलं. हे भारतीय संघाविरूद्ध त्याचे ११ वे शतक ठरले आहे. यासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाविरूद्ध खेळताना सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या रेकॉर्डमध्ये स्टीव्ह स्मिथची बरोबरी केली आहे. दोघांनी भारताविरूद्ध खेळताना ११ शतकं झळकावली आहेत.

या रेकॉर्डमध्ये राहुल द्रविडला टाकलं मागे

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावण्याचा रेकॉर्ड हा भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने ५१ शतकं झळकावली आहेत. भारतीय संघाविरूद्ध झळकावलेलं हे शतक रूटच्या कसोटी कारकिर्दीतील ३७ वे शतक ठरले आहे. यासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या रेकॉर्डमध्ये राहुल द्रविडला मागे सोडलं आहे. राहुल द्रविडच्या नावे ३६ शतकं झळकावण्याची नोंद आहे. तर स्टीव्ह स्मिथच्या नावे देखील ३६ शतकं झळकावण्याची नोंद आहे. त्यामुळे रूट हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारा पाचवा फलंदाज ठरला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारे फलंदाज

सचिन तेंडुलकर-५१ शतकं

जॅक कॅलिस- ४५ शतकं

रिकी पाँटींग – ४१ शतकं

कुमार संगकारा – ३८ शतकं

जो रूट- ३७ शतकं

राहुल द्रविड- ३६ शतकं

स्टीव्ह स्मिथ- ३६ शतकं

युनूस खान – ३४ शतकं

सुनील गावसकर- ३४ शतकं

ब्रायन लारा- ३४ शतकं

महेला जयवर्धने – ३४ शतकं

केन विल्यमसन- ३३ शतकं

अॅलिस्टर कुक -३३ शतकं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्टीव वॉ- ३२ शतकं