Joe Root Record: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टरच्या मैदानावर सुरु आहे.या सामन्यात फलंदाजी करताना जो रूटने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रूटने १७८ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं आहे. यासह कसोटी क्रिकेटमधील मोठ्या विक्रमात त्याने कुमार संगकाराच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. यासह भारताविरूद्ध सर्वाधिक शतकं झळकावणारा फलंदाज देखील ठरला आहे.
फॅब ४ मध्ये अव्वल स्थानी असलेल्या जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये आपली दमदार कामगिरी सुरू ठेवली आहे. मँचेस्टर कसोटीतील पहिल्या डावात फलंदाजी करताना आधी त्याने ओली पोपसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. पोप बाद झाल्यानंतर त्याने बेन स्टोक्ससोबत मिळून संघाची धावसंख्या ४०० धावांच्या पार पोहोचवली. यादरम्यान त्याने आपलं शतक पूर्ण केलं. यासह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज कुमार संगकाराच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. हे जो रूटच्या कसोटी कारकिर्दीतील ३८ वे शतक ठरले आहे. कुमार संगकाराच्या नावे देखील कसोटी क्रिकेटमध्ये ३८ शतकं झळकावण्याची नोंद आहे.
भारतीय संघाविरूद्ध सर्वाधिक शतकं
जो रूट हा कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाविरूद्ध सर्वाधिक शतकं झळकावणारा फलंदाज ठरला आहे. मँचेस्टरच्या मैदानावर झळकावलेले हे भारताविरूद्ध १२ वे शतक ठरले आहे. याआधी स्टीव्ह स्मिथने ११ शतकं झळकावली होती.
मोठ्या विक्रमात दिग्गज खेळाडूची बरोबरी
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये ५१ शतकं झळकावली आहेत. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या जॅक कॅलिसने ४५ शतकं झळकावली आहेत. तिसऱ्या स्थानी असलेल्या रिकी पाँटींगच्या नावे ४१ शतकं झळकावण्याची नोंद आहे. तर चौथ्या स्थानी असलेल्या कुमार संगकाराने ३८ शतकं झळकावली आहेत. आता जो रूट देखील ३८ शतकांसह संयुक्तरित्या चौथ्या स्थानी पोहोचला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारे फलंदाज
सचिन तेंडुलकर- २०० सामने, ५१ शतकं
जॅक कॅलिस- १६६ सामने, ४५ शतकं
रिकी पाँटिंग- १६८ सामने, ४१ शतकं
कुमार संगकारा- १३४ सामने, ३८ शतकं
जो रूट- १५७ सामने, ३८ शतकं