India vs England, Yashasvi Jaiswal Wicket: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडकडून जो रूटने शतकी खेळी केली. तर भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ५ गडी बाद केले. इंग्लंडचा पहिला डाव ३८७ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला.
भारतीय संघाकडून डावाची सुरूवात करण्यासाठी यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुलची जोडी डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानात आली. या जोडीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. जैस्वालने डावातील पहिल्याच चेंडूवर चौकार मारत डावाची सुरूवात केली. त्या त्याने ८ चेंडूत १३ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने एकाच षटकात ३ चौकार मारले. मात्र, जोफ्रा आर्चरने टाकलेल्या वेगवान चेंडूवर त्याला आपली विकेट फेकून माघारी परतावं लागलं.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने १५९६ दिवसांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये कमबॅक केलं आहे. तो २०२१ मध्ये आपला शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यानंतर त्याला दुखापतीमुळे संघाबाहेर व्हावं लागलं होतं. आता कमबॅक करताच त्याने पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वालला बाद करत माघारी धाडलं आहे. ज्यावेळी जोफ्रा आर्चर गोलंदाजीला आला, त्यावेळी सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून त्याचं कौतुक केलं.
तर झाले असे की, इंग्लंडकडून दुसरे षटक टाकण्यासाठी जोफ्रा आर्चर गोलंदाजीला आला. या षटकातील सुरूवातीचे २ चेंडू जैस्वालने खेळून काढले. मात्र तिसऱ्या चेंडूवर जैस्वालची बत्ती गुल झाली. जोफ्रा आर्चरने ओव्हर द विकेटचा मारा करताना लेग स्टंपवर चेंडू टाकला. हा चेंडू टप्पा पडताच बाहेर निघाला. या चेंडूवर जैस्वालने खेळून काढण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटची कडा घेत दुसऱ्या स्लिपमध्ये गेला. स्लिपमध्ये असलेल्या हॅरी ब्रुकने कुठलीही चूक न करता झेल घेतला आणि यशस्वीला बाद होऊन माघारी परतावं लागलं.