Jorich Van Schalkwyk: भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघाविरूद्ध खेळताना दमदार फलंदाजी केली होती. त्याने इंग्लंडविरूद्ध झालेल्या युथ कसोटी मालिकेत सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता. त्यानंतर त्याला जेव्हा विचारण्यात आलं होतं, त्यावेळी त्याने द्विशतक झळकावण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र,त्याच्याआधी दक्षिण आफ्रिकेच्या जोरीन वॅन शल्कविकने युथ वनडे क्रिकेटमध्ये द्विशतकी खेळी करण्याचा पराक्रम केला आहे. त्याने झिम्बाब्वेच्या १९ वर्षांखालील संघाविरूद्ध खेळताना हा मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे. असा विक्रम करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.
जोरीन वॅन शल्कविकचं विक्रमी द्विशतक
दक्षिण आफ्रिकेच्या १९ वर्षांखालील संघाकडून खेळताना त्याने झिम्बाब्वेच्या १९ वर्षांखालील संघाविरूद्ध खेळताना १५३ चेंडूंचा सामना करत आपलं द्विशतक पूर्ण केलं आहे. या खेळीदरम्यान त्याने ६ षटकार आणि १९ चौकार मारले आहेत. या दमदार खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने ३८५ धावांचा डोंगर उभारला. ही युथ वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या देखील आहे. हा देखील युथ वनडे क्रिकेटच्या इतिहासातील मोठा विक्रम आहे.
वैभव सूर्यवंशीने युथ वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, जोरीन वॅन शल्कविकने हे स्वप्न सत्यात उतरवलं आहे. जोरीन वॅन शल्कविक सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. गेल्या ३ सामन्यांमध्ये ही त्याची सर्वोच्च खेळी ठरली आहे. याआधी बांगलादेशच्या १९ वर्षांखालील संघाविरूद्ध खेळताना त्याने १६४ धावांची खेळी केली होती. बांगलादेशविरूद्ध खेळतानाही तो द्विशतकी खेळी करण्याच्या प्रयत्नात होता. पण इतक्यात पावसामुळे हा सामना थांबवण्यात आला. दक्षिण आफ्रिकेने डकवर्थ लुईस नियमानुसार १४ धावांनी हा सामना आपल्या नावावर केला होता.
जोरीन वॅन शल्कविक हा युथ वनडे क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम जॅक्स रुडोल्फच्या नावावर होता. २००० साली नेपाळविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याने १५६ धावांची खेळी केली होती. तर युथ वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम हा श्रीलंकेच्या बोयागोडाच्या नावावर आहे. त्याने २०१८ मध्ये केनियाविरूद्ध झालेल्या सामन्यात १९१ धावांची खेळी केली होती.